‘एअर स्ट्राईक’वेळी आपलेच हेलिकॉप्टर पाडले, अधिकाऱ्यांचे होणार कोर्ट मार्शल

1140

बालाकोटवरील ‘एअर स्ट्राईक’दरम्यान पाकिस्तानने हिंदुस्थानला प्रत्युत्तर देण्यासाठी लढाऊ विमान पाठवले होते. पाकिस्तानला हिंदुस्थानच्या वायूसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानसोबत संघर्ष सुरू असताना एका चुकीमुळे वायूसेनेने आपलेच एमआय-17 हेलिकॉप्टर पाडले होते. यासंबंधी आता वायूसेनेच्या सहा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

एएनआयला संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वायूसेनेमधील सहा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. यातील दोन अधिकाऱ्यांचे कोर्ट मार्शल होणार असून अन्य चौघांवर कायदेशीर कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. ‘एअर स्ट्राईक’बाबत बोलताना एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांनीही ती मोठी चूक असल्याचे कबुल केले.

वायूसेना दिनानिमित्त आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया म्हणाले की, पाकिस्तानसोबत हवाई संघर्ष सुरू असताना एमआय-17 हेलिकॉप्टर पाडणे आमची मोठी चूक होती. भविष्यात आम्ही अशी चूक करणार नाही. यासंबंधी आता तपास पूर्ण झाला असून आमच्याच क्षेपणास्त्रामुळे हे हेलिकॉक्टर क्रॅश झाले होते. आम्ही ही चूक स्वीकारत असून भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही असे आश्वासन देतो, असेही ते म्हणाले.

6 जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू
27 फेब्रुवारीला हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये हवाईसंघर्ष सुरू असताना एमआय-17 हेलिकॉप्टर श्रीनगरजवळील बडगाम भागात कोसळले होते. यात 6 जवानांचा आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. याचा तपास केला असता श्रीनगर एअर बेसवरून स्पायडर एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिमद्वारे पाकिस्तानी विमानांना लक्ष्य करताना चुकून आपल्याच हेलिकॉप्टरचा वेध घेतला गेला होता असे दिसून आले.

आपली प्रतिक्रिया द्या