
महागाईने सर्वत्रच कहर केला आहे. कोरोना महामारी काळात स्वस्तात हवाई सफर घडवणाऱया विमान कंपन्याही आता तिकिट दरवाढीचा भार प्रवाशांवर टाकण्याच्या तयारीत आहेत. केंद्र सरकारने विमान प्रवासाच्या तिकिट दरावरील कमाल मर्यादा हटवली असून विमान कंपन्यांना त्यांच्या मर्जीनुसार तिकिट दर आकारण्यास मोकळीक दिली आहे. त्यामुळे 31 ऑगस्टनंतर देशांतर्गत विमान प्रवास महागण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने देशांतर्गत विमान प्रवासाचे तिकिट दर निश्चित करण्याचे स्वातंत्र्य विमान कंपन्यांना दिले आहे. कमाल तिकिट दरावरील मर्यादा 31 ऑगस्टपासून मागे घेतली जाईल, असे नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी ट्विटद्वारे घोषित केले. सरकारने कोरोना महामारीच्या सुरुवातीला म्हणजेच मे 2020 मध्ये देशांतर्गत विमान प्रवासाच्या तिकिट दरावर मर्यादा आखून दिली होती. आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने विमान कंपन्यांच्या तिकिट दरावरील बंधन हटवले आहे. विमान इंधनच्या किंमती, विमान प्रवासासाठी वाढती मागणी या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करीत केंद्र सरकारने देशांतर्गत विमान प्रवासाच्या तिकिट दरावरील मर्यादा हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे विमान इंधनाच्या किंमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. त्याचा विमान कंपन्यांवर मोठा आर्थिक ताण पडला आहे. त्याचबरोबर विमान प्रवासाची वाढती मागणी याचा अत्यंत काळजीपूर्वक अभ्यास करून विमान कंपन्यांना देशांतर्गत मार्गावर तिकिट दर आकारणीसाठी मोकळीक दिली जात आहे, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे.
केंद्र सरकारने विमान कंपन्यांना तिकिट दरवाढीची सूट देतानाच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या नियमावलीचे विमान प्रवासादरम्यान काटेकोर पालन करण्याचे निर्देशही दिले आहेत.