अठरा अठरा तास उपाशी ठेवून काम करून घेतले – टिव्ही कलाकारांचा आरोप

74

सामना ऑनलाईन । मुंबई

झी टिव्हीवरील ‘ऐसी दिवानगी… देखी नही कही’ या मालिकेतील मुख्य कलाकारांनी त्यांना निर्मात्यांनी अठरा अठरा तास जेवण व पाण्याशिवाय काम करून घेतल्याचा आरोप केला आहे. ज्योती शर्मा आणि प्रणव मिश्रा या मालिकेत मुख्य भूमिका करत आहेत. त्यांनी त्यांना निर्मात्यांनी जनावराहून वाईट वागणूक दिल्याचे बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. हे आरोप करतच या दोघांनीही या मालिकेला रामराम ठोकला आहे.

जानेवारी २०१७ ला या मालिकेचे शूटींग सुरू झाले. सुरुवातीला आम्हाला आठ ते दहा तास काम करावे लागणार असे सांगितले होते पण शूंटींग सुरू झाल्यानंतर आमच्याकडून दररोज अठरा अठरा तास काम करून घेतले जावू लागले. आम्हाला शूटींगदरम्यान जेवण काय तर पाणी देखील प्यायला द्यायचे नाहीत. अक्षरश: जनावराहून वाईट वागणूक गेली वर्षभर आम्ही सहन केली आहे. त्यामुळेच आम्ही ही मालिका सोडली. असे ज्योतीने मुलाखतीत सांगितले आहे.

ज्योतीचा सहकलाकार प्रणवला देखील याच त्रासातून जावे लागले आहे. “शारीरीक छळासोबत आमचा मानसिक छळही केला जायचा. आमच्या करारानुसार आमच्या दोन शिफ्टमध्ये बारा तासांची वेळ असणे त्यांना बंधनकारक होते. पण आम्ही गेल्या वर्षभरातील २५० हून अधिक दिवस फक्त पाच तासच आराम करून सेटवर परतायचो. सिने अॅण्ड टिव्ही आर्टिस्ट असोसिएशनकडे (सिंटा) आम्ही याबाबत तक्रार केली असून त्यांनी आम्हाला स्ट्रेस टेस्ट करायला सांगितली होती. आमच्या दोघांच्याही चाचण्यांमध्ये आम्ही अतिशय नैराश्यात व तणावात असल्याचे नमूद केलेले आहे, असे प्रणवने सांगितले.

सिंटाने या दोघांची तक्रार दाखल करून याबाबत निर्मात्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. ‘ज्योती व प्रणवच्या वैद्यकीय अहवालानुसार ते दोघेंही प्रचंड तणावात आहेत. त्यामुळे त्या दोघांवरही मानसोचपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत. कलाकारांवर अशी वेळ येणे हे चुकीचे आहे. त्यामुळे आमची केअर कमिटी मेंबर नुपूर तत्काळ निर्मात्यांना जाऊन भेटली आहे. आम्ही त्यांची देखील बाजू ऐकून घेतली असून लवकरच कलाकार व निर्मात्यांसोबत आम्ही एकत्र बैठक घेणार आहोत.”असे सिंटाचे सचिव सुशांत सिंग यांनी सांगितले.

कामाच्या ताणावरून व चुकीच्य़ा वागणुकीवरून याआधी देखील काही कलाकारांचे निर्मात्यांशी भांडण झाले आहेत. बिग बॉस फेम शिल्पा शिंदे हिचे देखील भाभीजी घर पे है या मालिकेचा निर्माता विकास गुप्ता याच्याशी भांडण झाले होते. त्यानंतर शिल्पाला या मालिकेतून काढून टाकण्यात आले होते. तसेच अभिनेत्री किश्वर मर्चंटने देखील अशा प्रकारची तक्रार सिंटा कडे केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या