आजऱयात 8 एकरावरील ऊस, पाईपलाईन जळून खाक; गोवा वीज पुरवठा तारेचा जोरदार धक्का

आजरा तालुक्यातील किटवडे येथून सावंतवाडीमार्गे गोव्याला वीजपुरवठा करणाऱया टॉवरलाईनची तार तुटून शेतातील डीपीच्या तारांवर पडल्याने लागलेल्या भीषण आगीत परिसरातील 3 शेतकऱयांच्या 8 एकरावरील ऊस आणि शेतातील पीव्हीसी पाईपलाईन जळून खाक झाली.

किटवडे येथील रामचंद्र सावंत, गणपत पाटील आणि बाबू पाटील अशी नुकसानग्रस्त शेतकऱयांची नावे आहेत. याशिवाय एका शेतकऱयाची विद्युत मोटार जळाली आहे.

किटवडे परिसरात मालव यांच्या शेतात वीजवितरण डीपी आहे. यामधून परिसरातील शेतकऱयांना पाणीपुरवठासाठीच्या जोडण्या दिल्या आहेत. त्यासाठीच्या तारांवरून गोव्याकडे वीजवहन करणारी टॉवरलाईन जाते. त्याची जाडजूड आणि वजनदार तार तुटून डीपीच्या तारांवर पडली. त्यावेळी डीपीचा एक पोलही मोडून पडला. त्यावेळी सावंत यांच्या कुटुंबातील 4-5 माणसे शेतात काम करत होती. त्यांच्या पासून अगदी काही फुटांवर या तारा, मोठे स्पार्ंकग करीत आणि कर्णभेदी स्फोटक आवाज करीत कोसळल्या. दैव बलवत्तर असल्याने कोणाला इजा झाली नाही.

स्फोटक आवाजाबरोबर क्षणार्धात उभा ऊस पेटू लागल्याने सावंत कुटुंबीयांनी तेथून पळ काढला. परिस्थिती आकस्मिक आणि भयावह असल्याने कोणीही धाडस करू शकले नाही. मोटारींचा वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीही उपलब्ध झाले नाही. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी आले. त्यापाठोपाठ टॉवरलाईनचे 15-16 अधिकारीही तेथे आले.  टॉवरलाईन विभागाने झालेली नुकसानभरपाई मिळेल, असा शब्द दिला आहे. पण त्यासाठी ‘वीजवितरण’ने डीपीची तारजोडणी

त्वरित केल्यास विद्युत मोटारींच्या नुकसानीबाबतची मागणीही करणे शक्य होईल आणि साखर कारखान्यानेही जळीत उसाची उचल करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त करीत आहेत.