World cup 2019 विराटऐवजी ‘या’ खेळाडूला कर्णधार करा, जडेजाच्या वक्तव्याने वाद सुरू

40

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंड आणि वेल्समध्ये आयोजित आगामी विश्वचषकाचा प्रमुख दावेदार म्हणून हिंदुस्थानी संघाचे नाव घेतले जात आहे. विराट कोहलीचे नेतृत्व आणि खमके फलंदाज व धारधार गोलंदाजीच्या बळावर हिंदुस्थानचा संघ तिसऱ्यांदा विश्वचषकाची मानकरी होणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे. याच दरम्यान हिंदुस्थानचा माजी खेळाडू अजय जडेजा याने मात्र वेगळाच राग आळवला आहे. जडेजाच्या मते विश्वचषकामध्ये हिंदुस्थानचे नेतृत्व विराट कोहलीकडे न देता 2007 चा टी-20 विश्वचषक आणि 2011 चा एक दिवसीय विश्वचषक जिंकून देणाऱ्या धोनीकडे देण्यात यावे. जडेजाच्या या वक्तव्याने सर्वांनाच हैरान केले आहे.

अजय जडेजा म्हणाला की, आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये हिंदुस्थानी संघाची कमान विराट कोहलीकडे न देता धोनीच्या हाती द्यायला हवी. तसेच हा बदल फक्त विश्वचषकापुरताच मर्यादित असावा असेही तो म्हणाला. तसेच विराटचे नेतृत्व धोनीपेक्षा उजवे आहे असे कोणाला वाटत असेल तर त्याच्यासोबत चर्चेस मी तयार आहे, असेही तो म्हणाला.

याआधी विश्वचषकामध्ये धोनीसारखा अनुभवी खेळाडू हिंदुस्थानी संघात असल्याचे अनेक माजी खेळाडूंनी समर्थन केले होते. गावस्कर यांनीही धोनी जर विश्वचषकात खेळणार असेल तर ती संघासाठी मोठी गोष्ट असल्याचे मान्य केले होते. क्षेत्ररक्षण करताना कर्णधार विराटला धोनीची खूपच मदत होत असल्याचेही आपण पाहिले आहे. तसेच डीआरएस घेतानाही विराट धोनीचा सल्ला घेत असतो. गोलंदाजांचे मनोधैर्य वाढवण्याचे व कठीण परिस्थितीत अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचे मार्गदर्शनही धोनी करताना दिसतो. त्यामुळे त्याचे संघातील स्थान महत्त्वाचे असल्याचे अनेकांनी मान्य केले आहे. तसेच त्याचा फॉर्मही सध्या चांगला असून 2019 मध्ये त्याने चार अर्धशतकांसह 150 च्या सरासरीने धावा चोपल्या आहेत.

दरम्यान, जडेजाच्या वक्तव्यावर निवड समिती काय निर्णय घेते हे दिसेलच, पण असे होण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर विराटने आपल्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या संघाला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. परदेशातील कामगिरीतही हिंदुस्थानने सुधारणा केल्याचे दिसून आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या