हिंदुस्थान ‘अ’ची बाजी

23

मुंबई – अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थान ‘अ’ संघाने दुसऱया एकदिवसीय सराव सामन्यात इंग्लंडचा सहा गडी आणि ६२ चेंडू राखून धुव्वा उडवला. दुखापतीतून सावरलेल्या मुंबईकर रहाणेने ९१ धावांची खेळी करून आपण फिट असल्याने दाखवून दिले. शेल्डोन जॅक्सन (५९) व रिषभ पंत (५९) यांनीही आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी केली, तर सुरेश रैनानेही ४५ धावांची खेळी करीत हात साफ करून घेतला. फिरकीपटू परवेझ रसुलने कमालीची कंजूष गोलंदाजी करत स्वतःची क्षमता सिद्ध केली.

इंग्लंडकडून मिळालेले २८३ धावांचे लक्ष्य हिंदुस्थान ‘अ’ संघाने ३९.४ षटकांत चार फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यात सलामीवीर अजिंक्य रहाणेने ८३ चेंडूंत ९१ धावांची खेळी साकारताना एका षटकारासह 10 चौकार ठोकले. त्याने जॅक्सनच्या साथीने १८.५ षटकांत ११९ धावांची खणखणीत सलामी दिली. मोईन अलीने जॅक्सनला बॅरियस्टोकरवी झेलबाद करून इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. त्याच्या जागेवर आलेल्या रिषभ पंतने ३६ चेंडूंत दोन उतुंग षटकार व आठ सणसणीत चौकारांसह ५९ धावांची वादळी खेळी केली. या दोघांनी दुसऱया गडय़ासाठी ५२ चेंडूंत ७८ धावांची भागीदारी केली. विजयाच्या उंबरठय़ावर असताना रैना बाद झाल्यानंतर दीपक हुडाने (नाबाद २३) विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ४८.५ षटकांत २८२ धावसंख्या उभारली. त्यांच्याकडून ऍलेक्स हेल्स (५१), जॉनी बॅरियस्टो (६४), बेन स्टोक्स (३८) व अदिल रशीद (३८) यांनी उपयुक्त फलंदाजी केली. हिंदुस्थानकडून परवेझ रसुलने ३८ धावांत ३ बळी टिपले. प्रदीप सांगवान, अशोक दिंडा व शहाबाझ नदीम यांनी प्रत्येकी २ फलंदाज बाद केले, तर सिद्धार्थ कौललाही एक बळी मिळाला.

आपली प्रतिक्रिया द्या