कसोटी क्रिकेटची धुरा अजिंक्यकडे सोपवा! कोहलीकडे वन डे व टी-20 संघाचे नेतृत्व असू द्या

मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी क्रिकेट संघाने मंगळवारी ब्रिस्बेनमध्ये इतिहास रचला. ऑस्ट्रेलियामध्ये सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम यावेळी टीम इंडियाने करून दाखवला. कर्णधार विराट कोहलीची अनुपस्थिती, स्टार खेळाडूंनी दुखापतीमुळे घेतलेली माघार आणि ऍडलेड कसोटीत पराभूत झाल्यानंतरही 2-1 अशा फरकाने जिंकलेली मालिका… याच कारणामुळे आता विराट कोहलीऐवजी अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर हिंदुस्थानच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवा असा सूर क्रिकेटतज्ञांपासून क्रिकेटप्रेमींपर्यंत निघू लागला आहे. वन डे व टी-20 या क्रिकेटच्या प्रकारांमध्ये विराट कोहलीने नेतृत्व करायला हरकत नाही असेही काहींचे म्हणणे आहे.

 नेतृत्वात घवघवीत यश

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघाला घवघवीत यश संपादन करता आले आहे. आतापर्यंत अजिंक्य रहाणेने पाच कसोटींमध्ये हिंदुस्थानचे नेतृत्व केले आहे. यापैकी चारमध्ये हिंदुस्थानने विजय संपादन केला आहे. एक कसोटी ड्रॉ राहिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटींपैकी तीनमध्ये टीम इंडियाने बाजी मारली आहे. एक कसोटी ड्रॉ राहिली आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने अफगाणिस्तानविरुद्ध एक विजय मिळवला आहे.

नेतृत्व कौतुकास्पद – रवी शास्त्री

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वगुणाचे कौतुक केले. यावेळी ते म्हणाले, ऍडलेड कसोटीतील पराभवानंतर हिंदुस्थानचा संघ 0-1 असा पिछाडीवर होता. यामधून बाहेर येत मालिका जिंकण्याची करामत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाने करून दाखवली. या तिन्ही कसोटींमध्ये अजिंक्य रहाणेचे नेतृत्व कौतुकास्पद होते.

कोहलीला फक्त फलंदाज म्हणून खेळवा – मायकेल वॉन

इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉन यावेळी म्हणाला, अजिंक्य रहाणेकडे हिंदुस्थानच्या कसोटी संघाचे नेतृत्व कायमस्वरूपी असायला हवे. विराट कोहलीला फक्त फलंदाज म्हणून खेळवायला हवे. त्यामुळे संघाला आणखी बळकटी येईल.

आपली प्रतिक्रिया द्या