कस्तुरीचा सुगंध गवसला

77

<मेधा पालकर>

अजिंठा, वेरुळची शिल्पे जेव्हा वारली चित्रकलेतून उलगडतात तेव्हा दोन्ही कलांचा मिलाप एक वेगळीच अनुभूती देऊन जातो…

जगप्रसिध्द अंजिठा वेरूळ लेण्यांची शिल्पकार, मूर्तिकारांना भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. अनेक वर्षांचा इतका समृध्द ठेवा आपल्याकडे असताना आपण चित्रकलेतून तो साकारला नाही तर फार मोठी गोष्ट गमवितो आहोत या विचारातूनच संभाजीनगरमधील पद्मपुरा भागातील चित्रकार सुंदरलाल कुमावत यांनी बौध्दांच्या जीवनावरील जातकथा ३६ पेंटिंगच्या माध्यमातून तयार करायचे ठरविले आहे, तेही भल्या मोठय़ा कॅन्व्हासवर. पेंटिंग आणि वारली चित्रांमध्ये  हातखंडा असलेल्या कुमावत यांच्याशी संवाद साधला तेव्हा अंजिठा लेणीचा अनमोल ठेवा  चित्रातून कथारूपाने साकारताना जणू ‘कस्तुरी’चा सुंगध गवसल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

सुंदरलाल कुमावत यांचे वडील आणि पणजोबा दोघेही मूर्तिकाम करायचे. त्यामुळे मूर्तिकलेचा वारसा त्यांना मिळला. हीच कला पुढे जोपासत सुंदरलाल यांनी आर्ट कॉलेजमध्ये एटीडीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे बजाज ऑटोमध्ये २२ वर्षे नोकरी केली. नोकरी करत असतानाही त्यांनी आपल्यातला कलावंत सतत जागा ठेवला. वारली पेंटिंगची आवड असलेल्या सुंदरलाल यांनी  विविध वारली चित्रं साकारायला सुरुवात केली. जवळपास १ हजाराहून अधिक चित्रे कला प्रदर्शनांमधून त्यांनी विकली. चित्रांची नाजूक कलाकुसर आणि पेंटिंगमधून येणारा जिवंतपणा हे अचूकपणे साधणाऱया सुंदरलाल यांच्या चित्रांना परदेशातही मागणी आहे . त्यातच केंद्र सरकारचे मान्यताप्राप्त चित्रकार म्हणून त्यांना किताब मिळाला. मग देशात विविध ठिकाणी चित्रांचे प्रदर्शन भरविताना सुंदरलाल यांच्याही चित्रांचे दालन तिथे असायचे. त्यामुळे दिल्ली, मुंबई अशा ठिकाणी येणाऱया परदेशी व्यक्तींनाही कुमावत यांची चित्रे आवडय़ाची. अत्यंत माफक म्हणजे २०० रुपयांपासून त्यांची चित्रं ते विकायचे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आणि पुढील चित्रे काढण्यासाठी लागणारे रंगकामाचे साहित्य घेण्यासाठी चित्रे विकावी लागायची.

वारली चित्रांमध्ये त्यांनी खूप काम केले. त्याच काळात संभाजीनगरमधील इतिहासतज्ञ पं. रानडे यांच्याशी त्यांची भेट झाली. अजिंठा, वेरूळ लेण्यांचे संशोधन केलेल्या पं. रानडे यांच्यासारखा महान गुरू आपल्याला लाभला म्हणूनच हे दिवस आज दिसतायेत असेही सुंदरलाल यांनी नम्रतेने सांगितले.

ते म्हणाले, पं. रानडे यांनी अंजिठा, वेरूळ लेण्यांकडे पाहण्याची दृष्टी दिली. एवढचं नाही तर माझ्या चित्रकलेला वेगळीच दिशा मिळाली. आम्ही महिन्यातून एक दिवस या लेण्यांमध्ये घालवायचो. त्यातच पं. रानडे यांनी अभ्यास करून बौध्दांच्या जन्माची कथा ज्याला जातककथा म्हणतात, अशा ३६ जातककथा मला दिल्या. त्या वाचून पेंटिंगरूपाने कॅन्व्हासवर उतरविण्याचे भाग्य मला त्यांच्यामुळे मिळाले. गौतम बुध्दांचा संपूर्ण जीवनप्रवास या कथेतून उलगडत जातो.

तब्बल १२ पेंटिंग आतापर्यंत त्यांनी पूर्ण केली आहेत. तीन १५ फूट लांबीची आणि उर्वरित चार बाय ६ या आकारात आहेत. ते सांगतात की ही सर्व पेंटिंग मी स्वखर्चातून साकारत आहे. जसे पैसे उपलब्ध होतील तसे मी ते साहित्यासाठी खर्च करतो, पण आताच तयार झालेल्या पेंटिंगला मागणी होतेय, पण मी  मूळ पेंटिंगची विक्री करणार नाही. हा अनमोल ठेवा मी जतन करणार आहे. राहिलेल्या पेंटिंगवर माझे सध्या काम सुरू आहे. एक पेंटिंग करायला ८ दिवस आणि वारली चित्रे एका दिवसात ४ ते ५ तयार करतो. माझ्या नशिबाने मला गुरू लाभले. जगप्रसिध्द अंजिठा जवळ असताना आपण ते चित्रातून साकारले नाही तर आपण खूप मोठी गोष्ट आयुष्यातून गमविली असती. त्यामुळे ही पेंटिंग  साकारण्याचे भाग्य मला लाभले याचा आनंद आहे. माझी वारली चित्रे फ्रान्स, रशिया, चीनमध्ये गेली आहेत. अंजिठा पेंटिंग लाही या देशातून विचारणा होत आहे. नवीन सृजनशील चित्रे साकारण्याचाच माझा यापुढे प्रयत्न राहील. माझी पत्नी आणि मुलगा यांची मोलाची साथ मला लाभली असल्याचेही सुंदरलाल यांनी आवर्जून सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या