महिलांचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवा; मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांचे शिंदे सरकारवर टीकास्त्र

अनेक दिवसांपासून राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आता अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळ आल्याने त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता कमी आहे. या अधिवेशनातही काही खात्यांचा पदभार इतर मंत्र्यांकडे देण्यात येण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केले आहे.

विधानभवन येथे बुधवारी विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अजित पवार उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विचारण्यात आले, याबाबत ते म्हणाले, मी हा मुद्दा अनेकवेळा मांडला आहे. जाहीर सभेत याबाबत बोललो आहे. मंतिमंडळात महिलांना स्थान द्या, असेही मी सांगितले आहे. मात्र, हे सरकार महिलांचा अपमान करत आहे. महिलांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. पुढच्या निवडणुकीला विचार करूनच बटन दाबावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

या बैठकीत आगामी अर्थसंकल्पाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, सरकारने अधिवेशनाचा कालवधी एक आठवड्याने वाढवावा. यापूर्वी करोनामुळे अधिवेशन फार काळ घेता आले नाही. मात्र, आता करोनाची परिस्थिती नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांनी आता पळवाट काढू नये. लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी हे अधिवेशनाचा कालावधी वाढवणे गरजेचं आहे, असे ते म्हणाले.

राज्यात होणाऱ्या अश्लील लावणी नृत्य कार्यक्रमांवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत वेळ पडली तर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय मांडू, असा इशाराही दिला. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमीपणा आणणारे आहे. महाराष्ट्राची लावणीची एक परंपरा आहे. आपल्या इथे चालणारे लावणीचे कार्यक्रम सर्वांना पाहता येतील असे झाले पाहिजे. त्यात अश्लील प्रकार व्हायला नको. दुर्दैवाने काही जिल्ह्यांमध्ये अशा कार्यक्रमांना बंदी आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये ते चालू आहे. नक्की वस्तूस्थिती काय आहे याबाबत मी संबंधितांशी बोलणार आहे. तसेच वेळ पडली तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय मांडू, असेही ते म्हणाले.