>>सचिन कुलकर्णी
आपल्या बेताल वक्तव्याने महायुतीमध्ये नाराजीची ठिणगी पाडणाऱ्या खेकडाफेम पालकमंत्री तानाजी सावंत यांनी आयोजित केलेल्या लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमाकडे दोन्ही उपमुख्यमंत्र्यासह महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पाठ फिरवली. मिंधे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न केला असला, तरी दोन्ही उपमुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्र्याची अनुपस्थिती महायुतीमधील नाराजी उघड करणारी आहे.
परंडा येथील कोटला मैदानावर आज (14 सप्टेंबर 2024) महिला व बालविकास विभागाच्या वतीने महिला सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे या येणार असल्याचे सांगण्यात येत होते. कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नावेही होती. मात्र, आज आयोजित कार्यक्रमास केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच उपस्थित राहिले. या कार्यक्रमाकडे दोन्ही उपमुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्र्यानी पाठ फिरवली. पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मागिल काही दिवसांपूर्वीच आम्ही मंत्रीमंडळ बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसत असलो, तरी बाहेर आले की आम्हाला उलटी होते. तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी मनासारखा उमेदवार दिला नसल्याने तुमच्याकडे मते मागण्यासाठी आलो नाही, असे म्हणत लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराशी गद्दारी केल्याचे कबूल केले होते.
परिणामी, महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक मुख्यमंत्री देखील विमानाने लातूर येथे व नंतर हेलीकॉप्टरने परंडा येथे आले होते. दोन्ही उपमुख्यमंत्र्याना सोबत येणेही फार अशक्य बाब नव्हती. तसेच सरकारच्या महत्वकांक्षी असणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या आयोजित कार्यक्रमात खुद्द महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी देखील दांडी मारली. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सारे काही अलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील ही अनुपस्थित
सत्ताधारी भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे देखील कार्यक्रमाला अनुपस्थित होते. सरकारचा महत्वकांक्षी कार्यक्रम असल्याने व ते स्वत: सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने त्यांनी उपस्थित असणे गरजेचे होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांनी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीतही मनासारखा उमेदवार न दिल्याने आपण गद्दारी केल्याचे त्यांनी एका सभेत बोलताना मान्य केले आहे. त्यामुळे धाराशिव जिह्यातही महायुतीत मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे दिसून येत आहे.
हिंदूत्ववादी सरकारला ’एकादशी’चा विसर
आजच्या कार्यक्रमाला गर्दी करण्यासाठी सुमारे अडीचशे बसमधून जिह्यातील लाडक्या बहिणींची गर्दी जमवण्यात आली होती. मिंधे सरकार हे स्वत:ला हिंदुत्ववादी सरकार म्हणून घेते परंतू आज एकादशी असल्याचा विसर या सरकारला पडला. या ठिकाणी महिलांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. एकादशीचा उपवास असणाऱ्या महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. मात्र, एकादशी असणाऱ्या महिलांसाठी या ठिकाणी खाण्यासाठी शाबूदाना खिचडी किंवा अन्य पदार्थांची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना आज उपाशीच रहावे लागले.