गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी मुलगा डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्यासह आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना तिकीट नाकारून त्यांच्याऐवजी माजी मंत्री राजकुमार बडोले यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे संतापलेल्या मनोहर चंद्रिकापुरे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. या निवडणुकीत दादांना धडा शिकवणार, असे चंद्रिकापुरे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीच्या या निर्णयानंतर चंद्रिकापुरे यांनी जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी नाकारल्याने ते स्वत: निवडणूक लढकणार नसले तरी त्यांचे पुत्र डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार आहेत. चंद्रिकापुरे यांच्या या निर्णयामुळे अर्जुनी मोरगावमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऐनवेळी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या राजकुमार बडोले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर चंद्रिकापुरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांसह अस्वस्थता पसरली आहे.