पुण्यातील संभाव्य कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता तीन जम्बो रुग्णालये तातडीने उभारावीत – अजित पवार

593

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेता तातडीने तीन ठिकाणी जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याबाबतची दक्षता घ्यावी लागणार आहे. पुणे शहरासह जिल्हयातील ऑगस्ट अखेरची स्थिती विचारात घेता गतीने नियोजन करावे लागणार आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनासोबतच आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोरोना प्रतिबंधक तातडीच्या उपाययोजनांसाठी तसेच मंत्रालय स्तरावरील प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याचेही अजित पवार म्हणाले. खासगी दवाखान्यातून कोरोना उपचाराची मोठ्या रक्कमांची बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. खासगी रुग्णालयाचे बिल स्वतंत्र लेखा परीक्षकांच्या माध्यमातून तपासली जातील. शासनाच्या नियमानुसार उपचारांची दर आकारणी केली आहे का, याची शहानिशा करूनच रुग्णाला बिल दिले जावे, याबाबत सबंधित यंत्रणेने दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

प्रारंभी विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठीच्या सुविधा उभारणीबाबतचे प्रशासकीय पातळीवरील नियोजन गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी कोरोना उपचार व्यवस्थेबाबत तसेच उपलब्ध आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळ तसेच संभाव्य स्थिती विचारात घेत करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. कोरोना संसर्ग रोखण्यासोबतच पुणे शहरासोबतच ग्रामीण भागात आरोग्य सुविधा अद्ययावत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या