‘निवडणुका जवळ येतात त्या वेळेस पक्षांतरे होतात. या पक्षातून त्या पक्षात लोक जातात. मतदारसंघात आपल्याला संधी मिळणार नसल्याचे लक्षात येताच दुसरीकडे जातात. प्रत्येकाला आमदार व्हायचे आहे, म्हणून ते पर्याय शोधत असतात. निवडून येणारे उमेदवार जेव्हा नसतात, तेव्हा उमेदवार आयात करावे लागतात,’ असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाला लगावला.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन पवार यांच्या हस्ते बुधवारी झाले. खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे- पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर उपस्थित होते. भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला.
आणखीही काही नेते शरद पवार गटात जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले, ‘निवडणुका जवळ येतात त्या वेळेस पक्षांतरे होतात. या पक्षातून त्या पक्षात लोक जातात. मतदारसंघात आपल्याला संधी मिळणार नसल्याचे लक्षात येताच दुसरीकडे जातात. ज्या वेळेला आघाडी, युती किंवा तिसरी आघाडी असते, त्या वेळेस उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता बघितली जाते. प्रत्येकाला आमदार व्हायचे आहे, म्हणून ते पर्याय शोधत असतात. लोकसभा निवडणुकीवेळी काही लोकांना शब्द दिले होते; परंतु ते शब्द बाजूला गेले असून, दुसऱ्या लोकांना घेण्यात आले. अशा प्रकारच्या घटना राज्याच्या अनेक भागांत आपण पाहत आहोत. हे काही नवीन नाही. ज्यांच्याकडे निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार नाहीत, त्यांना दुसऱ्यांकडून उमेदवार घ्यावे लागतात आणि उमेदवारी जाहीर करावी लागते,’ असेही अजित पवार म्हणाले.
बारामतीतून मी लढावे, असा कार्यकर्त्यांचा आगृह असला, तरी मी तुमच्या मनातील उमेदवार देईन, असे सांगितल्याचे म्हणत अजित पवार म्हणाले की, ‘जुन्नर, आंबेगाव भागात बिबट्याला पकडण्यासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून अनेक पिंजरे उपलब्ध करून दिले आहेत. बिबट्यांना आवर घालण्यासाठी वन विभागाच्या नियमांच्या अधीन राहून जी खबरदारी घेता येईल, ती घेतली जाईल. काही बिबटे पकडून दुसऱ्या राज्यात पाठविले आहेत. अत्याचाराच्या घटना गंभीर असतात. बोपदेव घाटातील अत्याचार प्रकरणातील आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत. 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडून फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करू,’ असेही पवार म्हणाले.
चार-पाच दिवसांत आचारसंहिता
‘विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता चार-पाच दिवसांत लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमची सगळ्यांची धावपळ होत आहे. उद्घाटने, भूमिपूजन, लोकार्पण सोहळे घाईगडबडीत होत आहेत. दुसरीकडे महायुतीचा जागावाटपाचा तिढा बऱ्याच अंशी सुटलेला आहे. थोडाफार बाकी आहे, तो आम्ही एकत्र बसून सोडवू. ज्या वेळेस सुटेल, त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले जाईल,’ असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.