ही लढाई केवळ उद्धव ठाकरे यांची नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेची

शिवसेना नाव, पक्षचिन्ह फुटीरांना देण्याचा वादग्रस्त निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. सर्वसामान्य जनतेला हा निर्णय कदापि मंजूर नाही. आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाचा निर्णय तडकाफडकी का दिला, याचा विचार करण्याची गरज आहे. ही लढाई केवळ उद्धव ठाकरे यांची नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेची, लोकशाहीच्या भविष्याची आहे, असे रोखठोक मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते, आमदार अजित पवार यांनी व्यक्त केले. या मुस्कटदाबीला राज्यातील जनता चोख उत्तर देईल, असेही ते म्हणाले.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक प्रचाराची सांगता शुक्रवारी झाली. तत्पूर्वी, पत्रकार परिषद घेत अजित पवार यांनी पक्ष प्रचाराचा आढावा घेतला. अजित पवार म्हणाले, शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर हल्ला झाला. ‘मोक्का’तील आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. मोक्कातील आरोपी बाहेर कसे आले, पोलीस खात्याला कायदा-सुव्यवस्था चांगली ठेवणे समजत नाही का, निवडणुकीच्या काळात दहशत माजवू नये यासाठी पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपींना नोटिसा का दिल्या नाहीत? भ्याड हल्ले महाराष्ट्रात कधी पाहिले नव्हते. सत्तेचा गैरवापर केला जात आहे.

नारायण राणेंना एका बाईने हरवले

शिवसेना पाडण्याचा  ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला ते पुन्हा निवडून आले नाहीत असा इतिहास असल्याचे अजित पवार एका प्रचारसभेत म्हणाले. छगन भुजबळ यांच्यासह 19 जणांनी शिवसेना सोडली तेव्हाही हेच घडले. भुजबळ यांना विधान परिषदेवर जावे लागले. नारायण राणे यांचा तर दोन वेळा पराभव झाला. एकदा कोकणात तर दुसऱयांदा वांद्रेमध्ये ते हरले. वांद्रय़ात तर त्यांना एका बाईने हरवले, असे पवार यांनी सांगताच सभेत हास्यकल्लोळ उडाला. अजित पवार यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.