निर्णय लवकर घ्या… अन्यथा जनता मारल्याशिवाय राहणार नाही – अ‍ॅड. शशिकांत पवार

26

सामना प्रतिनिधी । जालना

राज्यकर्त्यांनी पूर्वीपासून मदत न केल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला आहे. सर्व भागात समाजबांधव उभे राहत आहेत. आत्महत्या करतायत. सबब आरक्षणाचा निर्णय त्वरित घ्या, नसता हजारो जातील. पण एक लक्षात ठेवा आता सगळेच उठतील अन् तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाहीत, असा गर्भित इशारा अ. भा. मराठा महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार यांनी येथे बोलताना दिला.

सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी संभाजी राजेंच्या पुतळ्यासमोर सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनास तिसऱ्या दिवशी मान्यवरांनी भेटी दिल्या. अ‍ॅड.पवार यांनी मुंबईतून मराठा बांधवांना कशा रीतीने हद्दपार केले जात असल्याची उदाहरणे दिली. मुख्यमंत्र्यांवर विश्वास राहिला नसल्याने त्यांच्याकडून चर्चेची आमंत्रणे मिळत असली तरी चर्चेसाठी जाणार नसल्याचे अ‍ॅड.पवार यांनी घोषित केले. मराठवाड्यातील चांगली माणस पेटली तर तुमची डोकी खाल्ल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देतानाच आज शांततेत बसलात उद्या तुम्हीच स्वतंत्र विचार करा, असा सल्लाही अ‍ॅड. शशिकांत पवार यांनी दिला.

छावा क्रांतिवीर संघटनेचे संस्थापक करण गायकर म्हणाले की, मराठवाड्यात सर्वाधिक तीव्रता असून ७ तारखेपर्यंत निर्णय न झाल्यास क्रांतिदिनी महाराष्ट्राची कोंडी करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण न दिल्यास त्यांना देश सोडून जावे लागेल, असा इशारा गायकर यांनी दिला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी मराठा समाजाच्या मागण्यापूर्ण होईपर्यंत काँग्रेस पक्ष सोबत असल्याचे वचन दिले. दरम्यान, उद्या शनिवार ४ ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.प्रदीप साळुंके यांचे सायंकाळी ४ वाजता आंदोलनस्थळी व्याख्यान होणार आहे.

आठवडी बाजाराचा निर्णय स्थगित
आरक्षणाची घोषणा होईपर्यंत जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय काल घेण्यात आला होता. तथापि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीने आज या निर्णयास स्थगिती दिली. सर्व आठवडी बाजार पूर्ववत सुरळीत राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

यांनी दिला पाठिंबा
मराठा आरक्षण आंदोलनास जालना जिल्हा काँग्रेस कमिटी, बहुजन समाज पार्टी, उत्तर भारतीय संघ, धोबी (परीट) सेवा मंडळ, पद्मशाली समाज संघटना, जय बजरंग ग्रुप, काँग्रेस अनुसूचित जाती विभाग या पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले.

आपली प्रतिक्रिया द्या