भाजप आमदार कल्याणशेट्टींचे विकासकामांकडे दुर्लक्ष, अक्कलकोटमधील 20 गावांनी दिला कर्नाटकात जाण्याचा इशारा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील 20 गावांनी कर्नाटकात जाण्याची मागणी करीत आंदोलन सुरू केले आहे. पाण्यासह मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप करीत अक्कलकोटचे भाजपचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्याच मतदारसंघात हे आंदोलन सुरू झाल्याने त्यांना दणका बसला आहे. सध्या या भागाचे जिल्हा परिषद सदस्यपदही भाजपचे माजी आमदार सिद्रमप्पा पाटील यांच्या पुत्राकडे आहे.

अक्कलकोट तालुक्यातील तडवळ, आळगी, हिल्लीसह 20 ते 30 गावांना रस्ते, पाणी, आरोग्य यांसह अनेक समस्यांना वर्षानुवर्षे तोंड द्यावे लागत आहे. यामुळे या परिसरातील गावकऱ्यांच्या मनात सध्या भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याविरोधात असंतोष आहे. या असंतोषातूनच गावकऱ्यांनी कर्नाटकात जाण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. हिल्ली येथे पाणीपुरवठा होण्यासाठी बंधारा बांधण्यात आला आहे; परंतु याचा लाभ मात्र या परिसरातील शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना मिळत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली असून, वैद्यकीय अधिकारीही उपलब्ध नाहीत. शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून, अनेक वर्षांपासून मागणी करूनही रस्ते तयार केले जात नाहीत, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे रस्ते, पाणी, वैद्यकीय सुविधा द्या; नाहीतर कर्नाटकात जाऊ, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांचा आंदोलनाला छुपा पाठिंबा

सध्या अक्कलकोट तालुक्यावर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे प्राबल्य आहे; परंतु विकासकामे करण्याकडे दुर्लक्ष झाल्याची भावना बळावत चालली असून, या आंदोलनाला छुपा पाठिंबा देत आंदोलनाचे व्हिडीओ भाजपचेच कार्यकर्ते व्हायरल करीत आहेत.