अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या भातपिकाचे नुकसान, अकोले तालुक्यातील आदिवासी शेतकरी संकटात

भात हे मुख्य पीक असणाऱ्या अकोले तालुक्यातील आदिवासी पट्टय़ातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी आणि वादळी वाऱयामुळे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला आणि काही ठिकाणी काढून ठेवलेले भातपीक पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे सडण्याची भीती निर्माण झाली आहे.

अकोले तालुक्यातील आदिवासी पट्टय़ात भात हे मुख्य पीक मानले जाते. सध्या भातकाढणीचा हंगाम सुरू झाला असून, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. तालुक्यात हळवे, गरवे व निमगरवे अशा तीन प्रकारच्या भाताची लागवड केली जाते. सुदैवाने टप्प्याटप्प्याने पडत गेलेल्या पावसामुळे चालू हंगामात भातपिके अपेक्षेपेक्षा चांगली बहरली होती.

मात्र, गेल्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. आले ते पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची जिवाच्या आकांताने धावपळ सुरू आहे. आदिवासी पट्टय़ात सर्वत्र हे विदारक चित्र आहे.

मदत देण्याची मागणी

अवकाळी व वादळी पावसाने भातपिकाचे नुकसान झाले आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे अगोदरच आदिवासी शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे. त्यात या अस्मानी संकटाने कंबरडेच मोडले आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून आदिवासी शेतकऱयांना मदत देण्याची मागणी गुहिरे येथील नागू धर्मा सोनवणे, नंदू धर्मा सोनवणे, सक्रू भगवंता सोनवणे व भंडारदरा येथील सरपंच विठ्ठल खाडे व सुनील सुकते यांनी केली आहे.

पाऊस थांबला नाही तर वर्षभर झळ सोसावी लागणार

पारंपरिक भाताची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांनी मोठय़ा आशेने या वाणांची लागवड केली होती. यामध्ये उंच वाढणारा काळ भात, शिरवेल, ढवळ या प्रमुख वाणांचा समावेश होतो. परंतु, हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नैराश्याचे वातावरण आहे.

पाऊस थांबला नाही तर नुकसानीचे प्रमाण वाढत जाईल आणि वर्षभर याची झळ इथल्या गरीब आदिवासी शेतकऱयाला सोसावी लागणार आहे. या अवकाळी पावसामुळे अजून नुकसान होऊ नये म्हणून आदिवासी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या