अकोला जिल्हा परिषदेत ‘वंचित’ला भाजपची ऐनवेळी मदत, नंदुरबारमध्ये काँग्रेस-शिवसेनेची सत्ता

1457

अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकला. भाजपच्या सात सदस्यांनी ऐनवेळी मतदानावर बहिष्कार टाकत ‘वंचित’ला मदत केल्याने अध्यक्षपदी प्रतिभा भोजने व उपाध्यक्षपदी सावित्री राठोड विजयी झाल्या तर नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना किंगमेकर ठरली असून अध्यक्षपदी काँग्रेसच्या सीमा वळवी तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे राम रघुवंशी यांची निवड झाली आहे.

53 सदस्यीय अकोला जिल्हा परिषदेत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही, मात्र 22 जागा जिंकून वंचित बहुजन आघाडी (भारिप-बहुजन महासंघ) सर्वात मोठा पक्ष ठरला होता. किजयी झालेले चारपैकी तीन अपक्ष वंचितसोबत गेल्याने त्यांचे संख्याबळ 25 पर्यंत पोहचले. मात्र, बहुमतासाठी आवश्यक 27 हा मॅजिक फिगरचा आकडय़ासाठी दोन सदस्य कमी पडत होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकत्रित सदस्यसंख्या 20 होती. त्यामुळे बहुमतासाठी भाजपच्या सात सदस्यांची मते महाकिकास आघाडीला आवश्यक होती, मात्र भाजपने त्यासाठी अध्यक्षपद शिवसेनेला मिळू नये अशा अटी ठेकत काँग्रेसला अध्यक्षपद देण्याचा आग्रह धरला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही अट मान्य केल्याने अकोला जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता येण्याची शक्यता होती, मात्र ऐनवेळी भाजपने मतदानाकर बहिष्कार टाकत वंचित बहुजन आघाडीला सत्ता स्थापनेसाठी अप्रत्यक्षपणे मदत केली.

नंदुरबारमध्ये शिवसेना ठरली किंगमेकर
नंदुरबार जिल्हा परिषदेत कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. जिल्हा परिषदेच्या 56 जागांपैकी भाजपला 23, काँग्रेसला 23, शिवसेनेला 7 तर राष्ट्रवादीला 3 जागा मिळाल्या होत्या. भाजप-राष्ट्रवादीने एकत्रित गट स्थापन केल्याने त्यांची संख्या 26 झाली होती, मात्र बहुमतासाठी आवश्यक 29 ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी त्यांना तीन मते कमी पडत होती. त्यामुळे 7 जागा असणाऱ्या शिवसेनेकडे सत्तेच्या चाव्या आल्या होत्या. अध्यक्षपदासाठी शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिल्याने प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी मतदान न घेता भाजप-राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांनी काँग्रेसच्या सीमा वळवी यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. उपाध्यक्षपदासाठी मात्र निवडणूक घेण्यात आली. यावेळी काँग्रेस व शिवसेना सदस्यांची सर्व 30 मते शिवसेनेचे राम रघुवंशी यांना तर भाजपच्या जयश्री पाटील यांना भाजप-राष्ट्रवादीची 26 मते मिळाल्याने रघुवंशी यांचा विजय झाला.

आपली प्रतिक्रिया द्या