सोशल मीडियावर फौजीविरोधात बदनामीकारक पोस्ट नको!

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार व फौजी या मोबाईल गेमची निर्मिती करणाऱया कंपनीच्या सीईओना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला. फौजी गेम बाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक माहिती पोस्ट करणाऱयांची दखल घेत न्यायाधीश व्ही व्ही विदवांस यांनी फौजी गेम प्रकरणी यापुढे कोणतीही पोस्ट अपलोड करू नका असे आदेश संबंधितांना दिले. त्याच बरोबर ट्विटर व इतर सोशल मीडिया कंपन्यांनीही पुढील सुनावणीपर्यंत प्रतिवाद्यांची पोस्ट आपल्या साईटवर अपलोड करू नये असे बजावले.

चीनच्या पबजी या गेमला टक्कर देण्यासाठी हिंदुस्थानातील एका कंपनीने फौजी या गेमची निर्मिती केली आहे. ऑक्टोबर मध्ये हा गेम डाउनलोड करता येणार असून अभिनेता अक्षय कुमार या गेमचा ब्रॅन्ड अँम्बेसीटर आहे. तर विशाल गोंदल हे गेम निर्मिती करणाऱया कंपनीचे सीईओ व संस्थापक आहेत. फौजी हा गेम तयार करणे ही मूळ कल्पना अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची होती असा दावा करत अशोक कुमार व जॉन डोई यांनी ट्विटर व इतर सोशल मीडियावर बदनामी सुरू केली आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून ही सोशल मीडियावरील ही बदनामी थांबवण्यात यावी म्हणून सत्र न्यायालयात सूट दाखल करण्यात आले आहे. त्यावर पार पडलेल्या सुनावणीवेळी न्यायाधीशांनी संबंधितांना पुढील सुनावणी पर्यंत फौजी गेम बाबत आक्षेपार्ह तसेच बदनामीकारक पोस्ट अपलोड करण्यास बंदी घातली एवढेच नव्हे तर संबंधित व्यक्ती हिंदुस्थान व इतर देशात फौजी गेम विरोधातील पोस्ट अपलोड करणार नाहीत याची दखल घेण्याचे आदेश ट्विटर व इतर सोशल मिडिया कंपन्याना दिले.

आपली प्रतिक्रिया द्या