आमीर खानच्या विनंतीवरून अक्षय कुमारने बदलली चित्रपटाची ‘रिलीज डेट’

1708

यंदा अनेक बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट एकाच दिवशी तिकीटबारीवर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यंदाच्या वर्षी बॉलिवूडवर घमासान युद्ध असल्याचं वृत्त काही काळापूर्वीच सामना ऑनलाईनने दिलं होतं. त्या चित्रपटांची यादी आणि त्यांच्या प्रदर्शनांच्या तारखांची माहिती देणारा एक व्हिडीओही सामना ऑनलाईनने प्रदर्शित केला होता. या यादीत अजून दोन चित्रपटांची भर पडण्याची शक्यता होती. मात्र, ती आता टळली आहे.

पाहा व्हिडीओ-  2020मध्ये तिकीटबारीवर होणार घमासान

यातला पहिला चित्रपट होता आमीर खान अभिनित ‘लाल सिंग चढ्ढा’ तर दुसरा चित्रपट होता, अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’. यंदाच्या ख्रिसमसच्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबर रोजी हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार होते. मात्र, आमीर खान याच्या विनंतीमुळे ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. त्यासाठी आमीर खान याने ट्वीट करून अक्षय आणि चित्रपटाचा निर्माता साजिद नाडियादवाला यांचे आभार मानले आहेत. ‘कधीकधी सगळे प्रश्न फक्त एका संवादाने सुटतात. अक्षय कुमार आणि साजिद नाडियादवाला या माझ्या दोन्ही मित्रांनी माझ्या विनंतीवरून त्यांच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाची तारीख पुढे ढकलली, त्यासाठी खूप धन्यवाद. मी त्यांना त्यांच्या चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा देतो’, अशा आशयाचं ट्वीट आमीर याने केलं आहे.

2019च्या जुलै महिन्यात अक्षयने ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट 2020च्या ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता हा चित्रपट 22 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील अक्षय कुमारचा लूकही प्रदर्शित झाला आहे. अक्षयसोबत या चित्रपटात क्रिती सेनन झळकणार आहे.

bachchan-pandey-look

आमीर खानचा आगामी ‘लाल सिंग चढ्ढा’ हा चित्रपट 1994 साली प्रदर्शित झालेल्या फॉरेस्ट गंप या हॉलिवूडपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. राजकारण, प्रेम, इतिहास, खेळ, युद्ध अशा अनेक भावभावनांचे ते मिश्रण असल्यानेच आमीरने ही कथा निवडल्याचं बोललं जात आहे. आमीरसोबत या चित्रपटात अभिनेत्री करीना कपूरही झळकणार आहे. हा चित्रपट 25 डिसेंबर 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या