Akshaya Tritiya – अक्षय आनंदाचा ठेवा

दिलीप देशपांडे << [email protected] >>

वैशाख शु. तृतीया म्हणजेच ‘अक्षय तृतीया.’ जे साडेतीन शुभ मुहूर्त आपण मानतो त्यातच अक्षय तृतीया हा एक पूर्ण मुहूर्त आहे. 3 मे रोजी सकाळी 5.18 वाजता अक्षय तृतीया तिथीला प्रारंभ होऊन 4 मे सकाळी 7.32 वाजेपर्यंत ही तिथी आहे. अक्षय म्हणजेच क्षय न होणारे, नाश न पावणारे. या दिवशी अन्नपूर्णा देवी जयंती, बसवेश्वर जयंती, नरनारायण या देवतेची जयंती, परशुराम जयंती असते. या दिवशी महर्षी व्यासांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून श्रीगणेशाने काम केले अशी आख्यायिका आहे.

या दिवशी दानाचेही अत्यंत महत्त्व आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या दानाचेही अधिक पटीने पुण्य मिळत असते. ते चिरकाल टिकणारे असते म्हणून अनेक जण अक्षय तृतीयेस छत्री, पायातल्या वहाणा, पाण्यासाठी माठ, रांजण, रुमाल, पंचे, कापड, वस्त्रे आदींचे गरजू व्यक्तींना, वृध्दाश्रमात, गोरगरीबांचे वस्त्यांत जाऊन दान करत असतात. जवस, गहू, हरभरा, दुग्धजन्य पदार्थ, जलकुंभ, सर्व प्रकारचे रस आणि उन्हाळ्यात उपयुक्त अशा वस्तूचे दान करत असतात. अनंत फलप्राप्ती होत असते. या तिथीला केलेले दान हवन आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजे अविनाशी आहे. ज्याला ज्या प्रमाणात शक्य असेल तेवढे त्यांनी जरुर करावे. सत्पात्री दान करावे अशी भावना आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करतात. विधिवत पूजा केल्यास आपले मनोरथ पूर्ण होतात.

या सुमारास उन्हाचे प्रमाण वाढलेले असते, तापमान खूप असते. म्हणून अनेक व्यापारी मंडळी, रस्तारस्यावर पाणपोई सुरू करतात. जनावरांच्या पाण्यासाठी हौद, हाळ बांधतात. ज्या ज्यापासून पुण्यप्राप्ती होईल ते ते करतात. कारण ते अक्षय आहे. अक्षय तृतीयेला पितरांचे स्मरण करून श्राध्द घालण्याचीही प्रथा आहे. या सणाच्या निमित्ताने मनात पितरांची स्मृती जागृत होते. त्यांचे आशीर्वाद घराला मिळतात. या दिवशी पवित्र नद्यांच्या संगमावर किंवा गंगास्नानाचे महत्त्व आहे. गंगास्नानाने ती व्यक्ती पवित्र होते, पापमुक्त होते असा समज आहे. अक्षय तृतीया हे नाव पडण्यामागचे कारण ‘मदनरत्न’ या ग्रंथात सांगितले आहे.

श्रीकृष्णाने युधिष्ठराला असे सांगितले होते की-

अस्यां तिथौ क्षयमुपैति ह्रतं न दत्तं ।
तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया.।।

श्रीकृष्ण म्हणतात- ‘हे युधिष्ठरा, या तिथीला केलेले दान, हवन, क्षयाला जात नाही.’ याविषयी एक कथा प्रचलित आहे. शाकल नगरीत धर्म नावाचा वाणी राहत होता. तो सर्वसामान्य लोकांसारखा नव्हता. तो सत्यवचनी होता. देवाची, ब्राह्मणाची पूजा करीत होता. एकदा एका ब्राह्मणाने त्याला अक्षय तृतीयेचे महत्त्व सांगितले. त्याला ते पटले. ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे त्याने नदीवर जाऊन स्नान करून पितरांना तर्पण करून ब्राह्मणांना दक्षिणा दिली. अशाप्रकारे प्रतिवर्षी हा उपक्रम त्याने नित्यनेमाने सुरू ठेवला होता. कोणत्याही विघ्नाची त्यांनी पर्वा केली नाही. धर्म नावाप्रमाणे धर्मासारखा जगाला. वागला. त्याचे भाग्य म्हणून परमेश्वराचे स्मरण करत असताना त्याला मृत्यू आला. गत जन्माची पुण्याई नंतर पुढील जन्मी त्याला कामाला आली आणि त्याला राज्यपद मिळाले. राज्यपद मिळाल्यावरही तो गर्विष्ठ बनला नाही आणि पूर्वीप्रमाणेच आपले दानधर्माचे व्रत सुरू ठेवले. परंतु त्याचा खजिना कधीच रिकामा झाला नाही आणि याचे कारण म्हणजे त्याने अक्षय तृतीयेला भरपूर दानधर्म केला होता.

हा मुहूर्ताचाच दिवस असल्याने, सोने, चांदी, दागिने. मौल्यवान वस्तूंची खरेदी. अनेक शुभ कामांना प्रारंभ केला जातो. नवीन जागा व्यवसायाचे उद्घाटन नवीन वाहन खरेदी नवीन संकल्प या दिवशी सुरू केले जातात. कोणतेही शुभ कार्य या दिवशी सुरू केल्यास ते कायमस्वरूपी टिकून राहते. या दिवशी कृषिसंस्कृतीचा पालक म्हणून बलरामाचीही पूजा होते. शेतकरी शेतीच्या कामाला सुरुवात करतात. शेतकरी शेती कामासाठी नवीन सालदाराची नेमणूक करत असत. आज ही प्रथा काहीच ग्रामीण भागात आढळून येते. काळानुसार प्रथा बदलतात.

सध्या सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने अशा परिस्थितीत ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी पाणपोई काढून पुण्य पदरी पाडावे,अशी स्थिती आहे. या काळात नामस्मरणालाही तेवढेच महत्त्व आहे. आपल्याला प्रिय असलेल्या देवतेचे होईल तेवढे नामस्मरण करावे. विष्णुसहस्रनाम, लक्ष्मीची उपासना करावी. या दिवशी केलेल्या नामस्मरणाने घरातील दोष नाहीसे होतात. आपल्याला आवडत्या देवतेचे नामस्मरण किंवा मंत्र पठण याने पुण्य अखंड टिकून राहते.

।। ओम नमो भगवते वासुदेवाय ।।

किंवा

।। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।।

असा जप आपण करू शकतो. स्त्रियांनी घरात चैत्र गौरीची स्थापना केली असते. या शेवटच्या दिवशी स्त्रिया हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात. गौरीला सांजोरी, करंजी, शेवेचा, नैवेद्यही दाखवतात. त्यानिमित्ताने महिला एकत्र येतात. आंब्याची डाळ, कैरीचे पन्हे देतात. मोगऱ्याच्या फुलांचे गजरे देतात. खान्देशात अक्षय तृतीया सण फार उत्साहात साजरा होतो. या भागात ‘आखाजी’ म्हणून हा ओळखला जातो. ग्रामीण भागात पत्त्याचे डाव रंगतात. जुगार खेळायला परवानगी असते. तरुण, वयस्कर सर्वच यात सहभागी होतात. गल्लीत, देवळाच्या ओटय़ावर, गोठय़ात, पारावर, जागोजागी डाव रंगलले दिसतात. मुली माहेरवाशीण म्हणून आलेल्या असतात. त्यांच्यासाठी पुरणपोळी, आंब्याचा रस, कटाची आमटी, काही ठिकाणी मांडे (म्हणजे खापरावर केलेल्या मोठय़ा पुरणपोळ्या) हा बेत हमखास असतो.

अनेक दृष्टीने अक्षय तृतीयेचे महत्त्व आहे. सुख, समृद्धी, आनंद देणारा सण आहे. काळाच्या ओघात अनेक प्रथा परंपरा कमी होत असल्याचे जाणवते. असे सणवार आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे. त्याची जपणूक करणे आपले काम आहे. महाराष्ट्रसह दक्षिण हिंदुस्थान, पश्चिम बंगाल, राजस्थान, या ठिकाणी अक्षय तृतीया सण साजरा केला जातो.

या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सर्वजण एक संकल्प करू. देवासमोर एक धान्याचा आणि दुसरा पाण्याने भरलेला असे कलश ठेवून सुख, समृद्धीसाठी अक्षय वरदान मागूया. यावर्षी अक्षय तृतीया 3 मे मंगळवार रोजी आहे. या वर्षी 50 वर्षांनंतर शुभयोग जुळून आला आहे. आपण सगळे सुख, समृद्धी, आरोग्य यासाठी, भगवान विष्णू आणि लक्ष्मीदेवीकडे प्रार्थना करूया.

अक्षय तृतीयेला भगवान परशुरामाची जयंती असते. भगवान विष्णूचा हा सहावा अवतार आणि अष्टचिरंजीवांपैकी एक चिरंजीव अशी त्यांची महती आहे. त्यांचे पूजन केले जाते. अनेक ठिकाणी परशुरामाची मिरवणूक काढण्यात येते. आपल्या महाराष्ट्रात चिपळूणजवळ भगवान परशुरामाचे मंदिर आहे. एके वर्षी आम्ही आमच्या सद्गुरू माऊलीसमवेत सात-आठ दिवस ऋषिकेशला होतो त्यावेळी अक्षय तृतीयेला गंगास्नान आणि स्वामी शिवानंद स्वामींच्या आश्रमात महाप्रसाद घेतला होता. त्या अक्षय तृतीयेचा आनंद अवर्णनीय आहे…