Akshaya Tritiya 2023 साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेला खरेदी करा ‘या’ 10 गोष्टी

हिंदू धर्मामध्ये शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेला दिवस म्हणजे अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2023). वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हा सण साजरा केला जातो. यंदा 22 एप्रिल रोजी हा सण आला असून मंगल कार्यांसाठी अत्यंत पवित्र असणाऱ्या या दिवशी सोनं-चांदीसह नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी सोन्याची खरेदी करण्याला लोकांचे प्राधान्य असते. परंतु यासोबतच अनेक गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता.

सोनं – अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. सोनं हा धातू संपत्ती आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करतो. या दिवशी सोनं खरेदी केल्याने भाग्य उजळते आणि यश मिळते, असे मानले जाते.

चांदी – सोन्याप्रमाणेच चांदीची खरेदीही शुभ मानले जाते. चांदीची भांडी, नाणी किंवा इतर वस्तू खरेदी केल्याने सौभाग्य आणि समृद्धी येते असे मानले जाते. अनेक जण या दिवशी आपल्या प्रियजनांना चांदीच्या वस्तूही भेट देतात.

रिअल इस्टेट – अक्षय्य तृतीयेला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणेही शुभ मानतात. या दिवशी जमीन, घर खरेदी केल्याने दीर्घकाळ समृद्धी नांदते असे मानले जाते.

शेअर्स – शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठीही हा दिवस उत्तम मानले जाते. अनेक लोकं या दिवशी शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. या दिवशी केलेली गुंतवणूक दीर्घकाळ चांगला परतावा देते, असे गुंतवणूकदार मानतात.

वीजेवर चालणारी उपकरणं – अक्षय्य तृतीयेला अनेक जण वीजेवर चालणारी उपकरणं खरेदी करण्यास प्राधान्य देतात. स्मार्टफोन, लॅपटॉप यासर घरगुती वापराच्या वस्तुंकडे लोकांची ओढ असते.

सोहळा संस्कृती – अक्षय्य पुण्यसंचयाचा दिवस

वाहन – या दिवशी कार किंवा दुचाकी खरेदी केल्याने समृद्धी मिळते असे मानतात. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला गाडी खरेदीसाठीही मोठी वेटिंग लिस्ट असते.

कृषी उपकरणं – हिंदुस्थान हा शेतीप्रधान देश असून अक्षय्य तृतीयेला कृषी उपकरणांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. या दिवशी ट्रॅक्टर किंवा इतर कृषी यंत्रसामग्री खरेदी केल्याने भरघोस उत्पन्न मिळते अशी मान्यता आहे.

कपडे – बरीच लोकं शुभ मुहूर्ताला कपडे खरेदी करतात. पारंपरिक किंवा नवीन कपडे खरेदी केल्याने घरात समृद्धी येते असे मानले जाते.

मातीचे भांडे – हिंदू धर्मग्रंथानुसार कलशाच्या गाभ्यामध्ये प्रजापिता ब्रह्मा, कंठात महादेव रुद्र आणि मुखात भगवान विष्णू वास करतात. कलश हे परिपूर्णतेचे प्रतीक आहे आणि ज्या घरात कलशाची पूजा केली जाते. त्या घरात सुख-समृद्धी आणि शांती सदैव राहते.

पुस्तकं – अक्षय तृतीयेला पुस्तकं खरेदी केल्याने ज्ञान, बुद्धी आणि समृद्धी मिळते असे मानले जाते. त्यामुळे अनेक लोक या दिवशी पुस्तकांची खरेदी करतात.