दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अलकायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित 6 संशयितांना ताब्यात घेतले आहे. छापेमारीनंतर अलकायदाचे मॉड्युल उघड झाल्याने एकच खळबळ उडाली. भिवाडीमध्ये या सहा संशयित दहशतवाद्यांना पकडल्यानंतर उत्तरप्रदेश आणि झारखंडमध्येही छापेमारी करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने भिवाडी पोलिसांसोबत मिळून चोपानकी जंगलात छापेमारी केली. दरम्यान शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण घेत असलेल्या संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अलकायदाच्या या मॉड्युलद्वारे प्रशिक्षण केंद्र चालवण्यात येत होते. संघटनेत असलेल्या तरुणांना इथे आणून त्यांना शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. मात्र ताब्यात घेण्यात आलेल्यांची ओळख जाहीर केलेली नाही. ज्या ठिकाणी हे प्रशिक्षण केंद्र चालवले जात होते तिथे घनदाट जंगल आहे. तो दुर्गम परिसर असल्यामुळे तिथे लोकांचे येणे-जाणे नव्हते. हा परिसर हरयाणा, राजस्थान आणि दिल्लीजवळ आहे. अनेकदा या परिसरात गोहत्येसह अनेक अवैध हालचालींची माहिती पोलिसांना मिळत असते. दिल्ली पोलीस आता अटक केलेल्या संशयितांची कसून चौकशी करत असून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करणार आहेत. प्रशिक्षणानंतर दहशतवाद्यांचे मनसुबे काय होते याचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
दिल्ली पोलिसांनी झारखंड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशहून 14 लोकांना ताब्यात घेत अलकायदाच्या एका दहशतवादी मॉड्युलचा भांडाफोड केल्याचा दावा केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील पोलीस दलासोबत मिळून एक अभियान चालवले. दिल्ली पोलिसांच्या एका प्रतिक्रियेत म्हटले आहे की, या मॉड्युलचे नेतृत्व रांचीचा डॉ. इश्तियाक नामावाचा व्यक्ती करत होता. त्याची देशात दहशतवादी कारवाया करण्याची योजना होती. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी मॉड्युलच्या सदस्यांना शस्त्रास्त्रे चालविण्यासह वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण दिले गेले होते. त्यावेळी राजस्थानच्या भिवाडीमध्ये सहा जणांना शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाताना ताब्यात घेण्यात आले आणि चौकशीसाठी झारखंड तसेच उत्तर प्रदेशहून आठ लोकांना ताब्यात घेतले आहे.