अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरचा वापर अंगलट; थेट रुग्णालयात दाखल

1542

कोरोनापासून बचावासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि साबणाने हात वारंवार धुणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे घराबाहेर पडल्यावर सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र, सॅनिटायझरचा अतिवापर टाळावा आता ते ज्वलनशील असल्याने त्याचा योग्य वापर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सॅनिटायझर वापराच्या दुष्परिणामाच्या काही घटनाही उघड होते आहे. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. मुंबईत एका 43 वर्षाच्या माणासाला अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरचा वापर करणे अंगलट आले आहे. या माणसाला 10 वर्षांपासून दारूचे व्यसन होते. ते सोडवण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून त्याच्यावर व्यसनमुक्तीचे उपचार सुरू होते. त्यामुळे अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर वापरल्याने त्याची रिअॅक्शन झाल्याने या व्यक्तीला थेट रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली.

मुंबईत 43 वर्षांचा माणूस कामानिमित्त बँकेत गेला होता. यावेळी कोरोना फैलाव रोखण्यासाठीच्या सुरक्षा नियमानुसार त्याला बँकेत जाण्यापूर्वी सॅनिटायझर हाताला लावावे लागले. तो सॅनिटायझर अल्कोहोलयुक्त होता. सॅनिटायझर लावून बॅकेत गेल्यानंतर काही वेळातच त्याचा चेहरा लालबुंद झाला आणि छातीवर आणि शरीरावरही लाल चट्टे उठले. त्याचप्रमाणे हृदयाचे ठोके वाढल्याचेही त्य़ाला जाणवले. त्यामुळे अस्वस्थता वाटत असल्याने त्याला तातडीने अंधेरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तपासणी केल्यावर त्याच्या हृदयाचे ठोके 100 च्या आसपास होते. तसेच हार्टरेट 102-103 पर्यंत होता. त्याच्यावर व्यसनमुक्तीचे उपचारसुरू असल्याची माहिती डॉक्टरांना समजल्यावर त्याला अँटिअॅलर्जीक औषधे देऊन ईसीजी काढण्यात आला. त्यानंतर तासाभरातच त्याच्या हृदयाचे ठोके सामान्य झाले आणि त्याची अस्वस्थता कमी झाली. तसेच चेहरा आणि शरीरावरील लाला डागही कमी झाले. अल्कोहोलिक सॅनिटायझरचा वापर केल्याने या व्यक्तीला रिअॅक्शन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या व्यक्तीवर उपचार करणारे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अविनाश डिसूझा यांना रुग्णालयाने फोन केला. त्यावेळी ही व्यक्ती गेल्या तीन वर्षांपासून दारू सोडण्यासाठी उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. दारूचे व्यसन सोडण्यासाठी त्याला डाइसल्फीरम औषध दिले जात होते. मात्र, अल्कोहोलयुक्त सॅनिटाझरमुळे रिअॅक्शन होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे डिसूजा यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या