अलर्ट मोटरमन व गार्डने जखमी प्रवाशाचे प्राण वाचविले

530

रात्री एकच्या सुमारास रेल्वे रुळांच्या कडेला अंधारात जखमी अवस्थेत पडलेल्या प्रवाशाला वेळीच पाहून लोकल थांबविणाऱया पनवेल लोकलच्या अलर्ट मोटरमन आणि गार्डचे सर्वत्र कौतुक होत आहे. हार्बर मार्गाच्या कुर्ला आणि चुनाभट्टी स्थानकांदरम्यान 29 वर्षांचा तरुण जखमी अवस्थेत पडला होता. मोटरमनच्या प्रसंगावधानाने त्याच्यावर लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.

हार्बर मार्गाच्या कुर्ला आणि चुनाभट्टी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांच्या शेजारी शनिवारी रात्री विनायक परब हा तरुण जखमी अवस्थेत पडला होता. पनवेल लोकलचे मोटरमन सूर्यकांत पाटील आणि गार्ड बबलू कुमार हे डय़ुटीवर असताना त्यांनी ट्रकच्या शेजारी जखमी प्रवाशाला पाहून इमर्जन्सी ब्रेक दाबले. मोटरमननी गार्डला या संदर्भात माहिती दिली आणि त्यांनी जखमी प्रवाशाला ट्रेनमध्ये ठेवण्यास सांगितले. गार्डनी जखमी प्रवाशाला तातडीने प्रवाशांच्या मदतीने लोकल ट्रेनमध्ये ठेवून कुर्ला स्थानकात आणले. कुर्ला येथे स्टेशनमास्तरांनी आधीच रेल्वे पोलिसांसह सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवली होती. जखमी प्रवाशाला तातडीने त्यामुळे शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करणे सोपे गेले. प्रवासी विनायक परब यांचे प्राण लोकलच्या क्रूने केलेल्या हालचालीने वाचले असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या वतीने या मोटरमन आणि गार्डचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या