नवी दिल्लीतील पोलीस ठाण्यांवर आत्मघाती हल्ल्यांची शक्यता; अलर्ट जारी

452

नवी दिल्लीतील पोलीस ठाण्यांना दहशतवादी लक्ष्य करण्याची शक्यता आहे. याबाबत गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिल्लीतील पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दहशतवादी एखाद्या वाहनाचा वापर करून पोलीस ठाण्यांवर दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे. पोलीस ठाण्यांना अलर्ट जारी केल्यानंतर दिल्लीतील 200 पोलीस ठाण्यात ये-जा करणाऱ्यांवर नजर ठेवण्यात येत आहे.

अलर्ट जारी केल्यानंतर दिल्लीतील अनेक पोलीस ठाण्यांचे मुख्य दरवाजे बंद करण्यात आले आहेत. तसेच मुख्यालयाबाहेर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असलेले सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. अनोळखी व्यक्ती आणि वाहनांना पोलीस ठाण्यात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. तसेच पोलीस ठाण्यात येणाऱ्या- जाणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. दिल्ली पोलीसांना पाच दिवसांपूर्वी अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर पोलीस ठाण्यांचे मुख्य दरवाजे बंद करण्यात आले आहेत. तपासणीनंतरच वाहनांना आत सोडण्यात येत आहे.

पाच ते सहा दहशतवादी पोलीस ठाण्यात घुसून घातपाती कारवाया करण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. त्यासाठी दहशतवादी एखाद्या वाहनाचा वापर करण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दहशतवाद्यांकडून सुरक्षा दल आणि पोलीस ठाण्यांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नवी दिल्लीत पोलीस ठाण्यांच्या परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या