‘या’ देशात आढळला मेंदू खाणारा अमिबा; संक्रमण पसरण्याचा धोका

कोरोना महामारीच्या काळात आरोग्याबाबतच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. चीनमधून कॅट क्यू नावाच्या व्हायरसचे संक्रमण पसरण्याचा इशारा आयसीएमआरने दिला आहे. तसेच महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमाभागात कांगो तापाचे काही रुग्ण आढळले आहेत. त्याचसोबत आता मेंदू खाणाऱ्या अमिबाच्या संक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे. मेंदू खाणारा हा अमिबा अमेरिकेतील टेक्सासच्या काही भागात आढळला आहे. त्यामुळे टेक्सासच्या प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

टेक्सासमध्ये सरकारकडून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यातील पाण्यात हा अमिबा आढळला आहे. कोरोना संकटाच्या काळात आणखी नवे संक्रमण पसरत असल्याने चिंता वाढली आहे. अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. आता अमेरिकेतच मेंदू खाणाऱ्या अमिबाचा धोका असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अमिबाच्या या नव्या प्रजातीचा अभ्यास करण्यात येत आहे. सुरक्षिततेसाठी टेक्सासच्या आठ शहरांमध्ये सरकारी पाणीपुरवठा योजनेतील पाणी वापरू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

टेक्सासमध्ये सहा वर्षांच्या बालकाचा या अमिबामुळे मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने तत्काळ दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे. तसेच पाणीपुरवठा योजनेतील पाणी वापरू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. टेक्सासला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅक्सन सरोवरातील पाण्यात हा अमिबा आढळल्याची माहिती शहराचे गव्हर्नर ग्रेग अबॉट यांनी दिली आहे. हा अमिबा झपाट्याने प्रतिरुप तयार करत असल्याने याच्या संक्रमणाचा धोका जास्त असल्याचेही ते म्हणाले. तसेच याचे संक्रमण घातक असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमिबाच्या या नव्या प्रजातीचे नाव नेगलेरिया फआऊलरली आहे. 2009 ते 2018 या काळात या संक्रमणाचे 34 रुग्ण आढळले होते. तर 1962 पासून 2018 पर्यंत 145 रुग्ण आढळले होते. ताज्या पाण्यात आढळणारा हा अमिबा पाण्यातून शरीरात प्रवेश करतो आणि नाकावाटे मेंदूत पोहचत मेंदू खाण्यास सुरुवात करतो. या अमिबाचे संक्रमण पसरण्याचा धोका कमी असला तरी हे संक्रमण घातक असते, असे अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिवेन्शनने म्हटले आहे. जलस्त्रोत प्रदूषित झाल्यास या प्रजातीचे अमिबा पाण्यात आढळतात. त्यामुळे टेक्सासच्या आठ शहरातील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या