Novak Djokovic – कार्लोस अल्कराजनंतर नोव्हाक जोकोविच US Open मधून बाहेर; 18 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

सर्बियाचा स्टार टेनिसपटू आणि पॅरीस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकावर मोहर उमटवणारा नोवाक जोकोविच यूएस ओपनमधून बाहेर फेकला गेला आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत तिसऱ्या फेरीततून त्याला गाशा गुंडाळावा लागला. शुक्रवारी आर्थर ऐश मैदानात झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा खेळाडू एलेक्सी पोपिरिन याने जोकिविचचा पराभव करत धक्कादायक निलाकाची नोंद केली. जोकोविचच्या आधी चार वेळचा ग्रॅण्डस्लॅम विजेत्या कार्लोस अल्कराज याचाही तिसऱ्या फेरीत पराभव झाला होता.

चार वेळच्या विजेता नोवाक जिकोविच आणि ऑस्ट्रेलियाचा खेळाडू एलेक्सी पोपिरिन यांच्यातील सामना 3 तास 18 मिनिटं चालला. पहिल्यापासून आघाडी घेत एलेक्सीने हा सामना 6-4, 6-4, 2-6 आणि 6-4 असा चार सेटमध्ये जिंकला. या सामन्यात जोकोविचशी झगडताना दिसला. त्याने तब्बल 14 डबल फॉल्ट आणि 49 अनफोर्स एरर केले.

गत 18 वर्षात पहिल्यांदाच नोवाक जोकोविच याला यूएस ओपनच्या तिसऱ्या फेरीचा अडथळा पार करता आलेला नाही. तर 2017 नंतर पहिल्यांदाच जोकोविचला कॅलेंजर इयरमध्ये एकही ग्रॅण्डस्लॅम जिंकता आलेले नाही. तसेच 2002 नंतर पहिल्यांदाच असे घडले की नोवाक जोकोविच, रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या तिघांपैकी एकही जण कॅलेंडर इयरमध्ये  ग्रॅण्डस्लॅम जिंकू शकलेला नाही.

सिंगलमध्ये सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम (महिला आणि पुरुष) जिंकणाऱ्यांमध्ये जोकोविच आणि ऑस्ट्रेलियाची माजी खेळाडू मार्गरेट कोर्ट संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. दोघांच्याही नावावर 24 ग्रॅण्डस्लॅमची नोंद आहे. मार्गरेटने 11 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन, 5 वेळा फ्रेंच ओपन, 3 वेळा विम्बल्डन आणि 5 वेळा यूएस ओपन स्पर्धा जिंकली. तर जोकोविचने 10 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन, 3 वेळा फ्रेंच ओपन, 7 वेळा विम्बल्डन आणि 4 वेळा यूएस ओपनवर नाव कोरले आहे. आता यूएस ओपनमध्ये पराभव झाल्यामुळे त्याला विक्रमी 25 वे ग्रॅण्डस्लॅम जिंकण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.