जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्रकक्ष विभाग पाच महिन्यापासून बंद

372

जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्रकक्ष विभाग दुरुस्तीसाठी पाच महिन्यांपासून बंद आहे. यामुळे रुग्णांची परवड होत असून डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना मुंबईमधील जेजे रुग्णालयात पायपीट करावी लागत आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या आजारावर उपचार करण्यासाठी नेत्रकक्ष विभागाची इमारत बांधण्यात आलेली आहे. सदर इमारतीची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात शस्त्रक्रिया कक्षात पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने शस्त्रक्रिया कक्ष बंद करण्यात आले आहेत. रुग्ण कक्षातही भींतीतून आणि स्लॅब मधून पाणी गळत होते. त्यामुळे नेत्रकक्ष विभाग जून महिन्यापासून बंद ठेवण्यात आलेला आहे.

पण  नोव्हेंबर महिना उगवल्यावरही  नेत्रकक्ष विभागात दिरंगाईने दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे नेत्रकक्ष विभागात डोळ्याच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना नेत्रकक्ष विभाग बंद असल्याने गैरसोय होत आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासाठी आता मुंबईत जेजे रुग्णालयात पाठविण्यात येत आहेत. यासाठी एसटी महामंडळ विभागाशी संपर्क करून एसटी बसमधून रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यासाठी नेले जात आहे. लवकरच नेत्रकक्ष विभागाचे काम पूर्ण होईल असे जिल्हा प्लॅनिंग अधिकारी डॉ. रामदेव वर्मा यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या