शेकापचे जिल्हा कार्यालयीन चिटणीस परेश देशमुख यांचा पत्नीसह भाजपात प्रवेश

सामना प्रतिनिधी। अलिबाग

शेकापचे कट्टर असलेले अनंतराव देशमुख यांचे पक्षाचे जिल्हा कार्यालयीन चिटणीस व विद्यमान चेंढरे ग्रामपंचायत सदस्य अॅड परेश देशमुख यांनी भाजपात मंगळवारी जाहीर प्रवेश केला. यावेळी त्याची पत्नी मिनाक्षी देशमुख व कार्यकर्ता महेश पवार यांनीही भाजपात प्रवेश केला. त्यामुळे ऐन चेंढरे ग्रामपंचायत निवडणूक तोंडावर शेकापच्या देशमुख दाम्पत्यानी केलेला प्रवेश शेकापला धक्का देणारा आहे.

अॅड. परेश देशमुख यांनी अलिबाग मधील भाजपा कार्यालयात जाऊन जाहीर प्रवेश केला. यावेळी त्याची पत्नी समीक्षा देशमुख व महेश पवार यांनीही प्रवेश केला. यावेळी अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष अॅड. महेश देशमुख, तालुकाप्रमुख हेमंत दांडेकर, युवा तालुकाप्रमुख अॅड. अंकित बंगेरा, सतीश लेले, उदय काठे, दर्शन प्रभू, आदित्य नाईक, राजेश पाटील, निलेश महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

23 जून रोजी जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका होत आहेत. यामध्ये चेंढरे ग्रामपंचायत ही प्रतिष्ठेची असून शेकापचे वर्चस्व या ग्रामपंचायतीवर आहे. अॅड. परेश देशमुख हे चेंढरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य असून त्याचा जनसंपर्क दांडगा आहे. शेकापच्या जिल्हा कार्यालयीन चिटणीस पदाची धुरा त्याच्या वडीलानंतर पक्षाने दिली होती. ती जबाबदारी ते लीलया उचलत होते. पक्षांच्या माध्यमातून चेंढरेचा विकासात्मक कामात त्यांचा पुढाकार होता.

देशमुख यांनी भाजपात प्रवेश केल्याने शेकापला हा मोठा धक्का आहे. देशमुख कुटूंब पक्ष स्थापनेपासून शेकाप सोबत राहिला असून त्याची तिसरी पिढी शेकाप सोबत होती. परेश देशमुख यांच्या जाण्याने पक्षाची मोठी हानी होणार आहे.

“शेकापने मला पक्षात असताना भरपूर प्रेम मिळाले. मात्र चेंढरे ग्रामपंचायत मध्ये काम करताना ज्या सदस्यासोबत काम करीत होतो. त्यात मी समाधानी नव्हतो. मला ज्या पद्धतीने चेंढरे ग्रामपंचायतीचा विकास करायचा आहे तो शेकापात राहून करता आला नसता. भाजपमध्ये विकासाची दूरदृष्टी असल्याने मी भाजपात प्रवेश केला व पुढेही पक्ष वाढीसाठी काम करणार आहे”. असे देशमुख यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल सांगितले.