अलिबाग – सोनोग्राफी विभागातील डॉक्टरांचे कामाकडे दुर्लक्ष

सामना प्रतिनिधी, अलिबाग

जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी विभागातील क्ष किरणतज्ज्ञ डॉ. सुहास ढेकणे हे रुग्णांची सोनोग्राफी न करता त्यांना पुढील तारीख देत असल्याची तक्रार रुग्ण व लोकप्रतिनिधी यांनी जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. अजित गवळी यांच्याकडे केली होती. त्यानुसार डॉ. सुहास ढेकणे याना कारणे दाखवा नोटीस काढून कामाचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. अजित गवळी यांनी दिले आहे.

जिल्हा रुग्णालयात गरोदर महिलांना तसेच रुग्णाच्या आजाराचे निदान व्हावे यासाठी सोनोग्राफीची सुविधा करण्यात आलेली आहे. खाजगी रुग्णालयात सोनोग्राफीसाठी जास्तीचे दर आकारणी केली जाते. त्यामुळे सर्व सामान्य रुग्णांना जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी सुविधेचा लाभ घेतात. सोनोग्राफी विभागातील पूर्वीचे डॉ. डांगे यांची बदली झाल्यानंतर डॉ. सुहास ढेकणे हे 27 फेब्रुवारी 2019 रोजी रुजू झाले. मात्र डॉ. ढेकणे हे कामावर रुजू झाल्यापासून सोनोग्राफी करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. याबाबत रुग्णांनी व लोकप्रतिनिधीनी जिल्हा शल्यचिकिस्तक यांच्याकडे डॉ. ढेकणे यांच्याबाबत तक्रार दाखल केली होती.

डॉ सुहास ढेकणे यांच्या विरोधात आलेल्या तक्रारीनंतर जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ अजित गवळी यांनी डॉ ढेकणे याना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. यामध्ये डॉ. डांगे हे सामान्य रुग्णालयात सोनोग्राफी विभागात काम करीत असताना 50 ते 60 रुग्णांच्या सोनोग्राफी होत होत्या. डॉ. डांगे यांची बदली झाल्यानंतर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. बडगिरे ह्या गरोदर महिलांची सोनोग्राफी करीत होत्या. डॉ सुहास ढेकणे आपण कामावर रुजू झाल्यापासून सोनोग्राफी विभागातील कामकाज कमी झाले आहे. तसेच सोनोग्राफी करण्यास येणाऱ्या रुग्णांना आपण पुढील तारीख देत असून आपली नेमणूक या विभागात पूर्ण वेळ नियुक्ती झाली असताना आपण हजर नसता असे निर्दशनात आले असल्याचे नोटिशीमध्ये म्हटले आहे.

त्याचबरोबर सोनोग्राफी विभागात रोज साडे अकरा वाजेपर्यत सकाळी व दुपारी तीन ते साडेपाच या वेळेत हजर राहून सोनोग्राफी व रिपोर्टिंग अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे द्यावा असे नोटीस मध्ये म्हटले आहे. तर डॉ. बडगिरे यांनीही रोज सोनोग्राफी विभागात साडे अकरा ते दीड वाजेपर्यत उपस्थित रहावे तसेच अहवाल सादर करावा असे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या नोटीशीत म्हटले आहे. जिल्हा शल्यचिकिस्तक यांनी दिलेल्या या नोटीसीनंतर सोनोग्राफीसाठी येणाऱ्या रुग्णांना त्रास सहन करावा लागणार नाही अशी आशा रुग्ण बाळगीत आहेत.