भीषण! दोन बसची समोरासमोर धडक, 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू; 30 जखमी

उत्तर प्रदेशमधील अलिगड येथे हरयाणा रोडवेजच्या दोन बसची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातामध्ये चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. शनिवारी ही अपघात झाला. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, हरयाणा रोडवेजच्या एका बसचे पुढचे टायर फुटल्याने हा अपघात झाला. टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस डिव्हायडरवर चढून विजेच्या खांबाला धडकली आणि त्यानंतर समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की बसचे पत्रे अक्षरश: फाटले आहेत.

दरम्यान, अपघातानंतर परिसर प्रवाशांच्या किंचाळ्यांनी शहारून गेला. प्रवाशांच्या आर्त किंचाळ्या ऐकून आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली आणि जखमींना बसमधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनीही शेतकऱ्यांची मदत केली.

चार ठार

अपघातामध्ये चार प्रवाशी जागीच ठार झाल्याची माहिती अलिगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच 30 जण जखमी असून यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या