अलिगढमध्ये विषारी वायू गळती, 100 जण रुग्णालयात दाखल

उत्तर प्रदेशच्या अलिगढ येथे एका मांसविक्री करणाऱ्या कंपनीत विषारी वायू गळती झाल्याने 100 हून अधिक जणांची प्रकृती बिघडली आहे. या गळतीनंतर तेथे काम करणाऱ्या मजुरांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

बुधवारी अलिगढ येथील अल दुआ मीट फॅक्टरी येथे गुरुवारी हा अपघात घडला. नेहमीप्रमाणे येथे काम सुरू होतं. पण, अचानक कर्मचारी खाली कोसळू लागले. एकामागोमाग एक कर्मचारी बेशुद्ध पडू लागले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पाहता पाहता कर्मचाऱ्यांची संख्या 100वर गेली.

या कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा देखील समावेश आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराचा शोध लावला तेव्हा विषारी वायूगळतीमुळे कर्मचारी बेशुद्ध पडल्याचं आढळून आलं. या प्रकरणी कंपनीच्या मालकावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. कंपनी मालकाने हा प्रकार दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांना या प्रकरणात गप्प राहण्याचे देखील त्याने आदेश दिले होते. पण, या घटनेचे फोटो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला याची माहिती मिळाली.

या कंपनीत मांसाची विक्री करण्यासाठी त्याच्यावर प्रक्रिया करून ते पॅक करण्याचं काम केलं जातं. या भागात महिला कर्मचाऱ्यांचा राबता असतो. तेव्हाच या कंपनीत अमोनियाची गळती सुरू झाली आणि कर्मचारी बेशुद्ध पडले. बेशुद्ध कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असून त्यापैकी बहुतेकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.