अलीगड रोडवेजचे कर्मचारी रंगले दारू पार्टीत, तीन जण निलंबीत

सामना ऑनलाई। अलीगड 

उत्तरप्रदेश राज्य परिवहन निगमच्या (रोडवेज) अलीगड डेपोमध्ये कर्मचाऱ्यांचा दारू पितानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. बिल तपासणी विभागातील कर्मचारी काम करता करता दारूचे प्याले रिचवत होते. या प्रकरणी तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून एकाला बडतर्फ करण्यात आले आहे.

अलीगड डेपोमध्ये कर्मचारी अतिशय शिताफीने कुणाला संशय येऊ नये म्हणून टेबलाच्या खणामध्ये दारूचे ग्लास ठेवून भरत होते. मात्र या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वरिष्ठ लिपिक मुकेश सक्सेना, लिपिक पुष्पेंद्र गहराना आणि परिचालक राकेश यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तर एकाला बडतर्फ करण्यात आले असून त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.