व्हिडीओ व्हायरल प्रकरण; सर्व शिवसैनिकांची जामिनावर सुटका

शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा कथित व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी अटक केलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 7 शिवसैनिकांची गुरुवारी बोरिवली न्यायालयाने जामिनावर सुटका केली. यात युवासेनेचे साईनाथ दुर्गे यांच्यासह अशोक मिश्रा, मानस अनंत कुवर, विनायक डायरे, रवींद्र चौधरी, अक्षय धनधर, यशवंत विचले या शिवसैनिकांचा समावेश आहे.

शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी साईनाथ दुर्गे यांच्यासह 7 शिवसैनिकांना अटक केली होती. दुर्गे हे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. सातही शिवसैनिकांना याआधी सुनावलेल्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर केले होते. यावेळी बोरिवली न्यायालयाने साईनाथ दुर्गे यांच्यासह इतर सहा आरोपींना जामीन मंजूर केला. सुनावणीवेळी शिवसैनिकांच्या वतीने ज्येष्ठ वकील राजेश मोरे आणि अनिल पार्टे यांनी काम पहिले, तर अॅड. प्राची पार्टे, मेराज शेख यांनी न्यायालयापुढे बाजू मांडण्यात सहकार्य केले.