अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेचे शानदार उद्घाटन

14

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेचा उदघाटनसोहळा के. सी. महाविद्यालायाच्या सभागृहात मंगळवार, 11 डिसेंबर रोजी प्रमुख पाहुणे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. मुंबई विद्यापीठांतर्गत के.सी. महाविद्यालाद्वारे आयोजित ह्या स्पर्धेस संबोधित करताना प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांनी सांगितले की, खेळ हा जीवनाचा अविभाज्य घटक असून क्रीडा विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करणे ही कामांची गरज आहे. याप्रकारच्या स्पर्धांच्या निमित्ताने केवळ सामनेच होत नाहीत तर विभिन्न राज्यातील खेळाडू एकत्र येतात व त्यांच्या विचारांचे व संस्कृतीचे आदान-प्रदान होते व तसेच त्यांच्यात नेतृत्वगुण व संघटनशक्तीचा विकास होतो. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत 161 वर्षात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेची जबाबदारी उत्तमरित्या सांभळल्याबद्दल त्यांनी के. सी. महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन केले. त्यासोबतच H(S)NC बोर्डाकडून निरंतर मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी बोर्डाचे आभार मानले. त्यांनी विश्वास व्यक्त केला की ही स्पर्धा ऐतिहासिक आणि संस्मरणीय होईल.

H(S)NC बोर्डाचे अध्यक्ष अनिल हरीश यांनी म्हटले की, फुटबॉल हा असा खेळ आहे की जो प्रत्येक जण खेळतो. भारतात फुटबॉल हा खेळाला फार जुना इतिहासआहे. डुरंड कपची सुरुवात 1988 साली झाली, ज्याची आजही क्रीडा क्षेत्रात खास ओळख आहे. पुढे ते म्हणाले की, मी आज खेळाडूंना असा संदेश देऊ इच्छितो की, मैदानात जरी तुम्ही एकमेकांविरुद्ध खेळत असाल तरीही मैदानाबाहेर एकमेकांचे मित्रा बनून राहा. याच क्रमाने डॉ. निरंजन हिरानंदानी व किशु मनसुखानी यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.

आपल्या स्वागतपर भाषणात के. सी. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हेमलता बागला यांनी म्हटले की या स्पर्धेचे आयोजन करणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. यासाठी आमच्यावर आयोजनाची जबाबदारी सोपविणाऱ्या मुंबई विद्यापीठ व ऑल इंडिया युनिव्हर्सिटी असोसिएशनची मी आभारी आहे. त्यासोबतच सदैव प्रोत्साहित करणारे कुलगुरू प्रो. डॉ. सुहास पेडणेकर, यथोचित सहकार्य करणारे योगिनी खरे व उत्तम केंद्रे यांचेदेखील त्यांनी अभिवादन केले. ते म्हणाले की H(S)NC बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाशिवाय असे कार्यक्रम आयोजित करणे असाध्य आहे. सोबतच महाविद्यालयाचे उपप्राचार्य स्मरजीत पाधी, डॉ. शालिनी सिन्हा, महेक ग्वालानी व करील शिक्षक देवकुमार चटर्जी ज्यांनी ह्या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केलेत यांचेही डॉ. बागला यांनी कौतुक केले. त्यांनी खेळाडूंना सांगितले की, जिंकण्याइतकेच महत्व सहभागी होण्यास आहे म्हणून आपण सर्वांनी सकारात्मक ऊर्जेने खेळावे व मुंबईहून परतताना सोनेरी आठवणींची शिदोरी सोबत न्यावी. ही स्पर्धा खेळाडूंच्या जीवनातील उल्लेखनिय पायरी ठरावी अशी शुभेच्छादेखील त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी इंटरनॅशनल अॅथलेटिक्स फेडरेशन काऊंसिलचे सदस्य व माजी ऑलम्पियन एडिले जे. सुमारिवाला यांची विशेष उपस्थिती होती. उल्लेखनीय बाब अशी की दोन टप्प्यात आयोजित केलेल्या या स्पर्धेत देशातील 81 विविध विद्यापीठांच्या 1100 खेळाडूंसमवेत 1200 पेक्षा जास्त सभासद सहभागी होतील.

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात दिनांक 11 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत अखिल भारतीय आंतरविद्यापीठ (पश्चिम विभाग) फुटबॉलचे सामने होतील. दि. 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर या दरम्यान आंतरविद्यापीठ फुटबॉलचे सामने होतील. ह्या स्पर्धेत एकूण 104 सामने खेळले जातील. सर्व सामने मरीन लाईन्स येथील युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स पवेलीयन व मुंबई आणि नवी मुंबईतील मैदानांवर खेळले जातील.

मुंबई विद्यापीठात उघडणार क्रीडा व्यवस्थापन विभाग

कुलगुरु प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांनी सांगितले की, विद्यापीठात क्रीडा व्यवस्थापन विभाग सुरू करण्याबाबत गंभीरतेने विचार केला जात आहे. ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेसाठी अन्य देशांमधून निवड झालेले खेळाडू हे त्या-त्या देशातील विद्यापीठातून तयार झालेले असतात. परंतु हिंदुस्थानात ते प्रमाण कमी आहे याच मुद्द्यास विचारात घेऊन क्रीडा व्यवस्थापन विभागाच्या निर्मितीच्या दिशेने प्रयत्न चालू आहेत. कारण खेळांना रोजगार स्वरूप प्राप्त करून देणे ही काळाची गरज आहे.

पुढील वर्षी आंतरविद्यापीठ अॅथलेटिक चॅम्पियनशिप

प्राचार्या डॉ. हेमलता बागला यांनी आपल्या भाषणात इच्छा व्यक्त केली की, आंतरविद्यापीठ अॅथलेटिक चॅम्पियनशिपचे यजमान पद मिळावे. यावर प्रतिक्रिया देताना कुलगुरू डॉ. पेडणेकर म्हणाले की, संलग्नित महाविद्यालयेच मुंबई विद्यापीठाची ताकद आहेत. व के.सी. महाविद्यालयाने अशा प्रकारच्या स्पर्धांचे उत्तमरीत्या आयोजन केले आहे. त्यामुळे या विषयावरती सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देत कुलगुरू म्हणाले की, सन 2019 ची आंतरविद्यापीठीय अॅथलेटिक चॅम्पियनशिप मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत होण्यासाठी आमचे संपूर्ण प्रयत्न असतील.

आपली प्रतिक्रिया द्या