Pulwama Attack : दहशतवादाविरोधात विरोधक सरकार आणि लष्करासोबत

21

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत सर्व पक्षाच्या नेत्यांना पुलवामा आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याची माहिती देण्यात आली. या बैठकीनंतर विरोधीपक्ष सरकार आणि लष्करासोबत असल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. कश्मीरमधील जनतेला शांतता हवी आहे. मात्र, राज्यातील काही तत्त्व सीमेपलीकडील दहशतवाद्यांना मदत करत आहेत. अशी तत्त्वे कश्मीरचे शत्रू आहेत. संपूर्ण देश एकत्र येऊन दहशतवादाविरोधात लढाई लढण्यास सज्ज आहेत. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे संसदीय कार्यमंत्री नरेंद्र तोमर यांनी सांगितले. या बैठकीत त्रिसूत्रीय प्रस्तावही मंजूर करण्यात आला.

देश एकत्र येऊन दहशतवादाला उखडून फेकेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. जम्मू कश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात येईल. कमी वेळेत सर्व पक्षाचे नेते एकत्र आल्याबाबत राजनाथ यांनी सर्व पक्षांचे आभार मानले. सर्व पक्षांनी मौन पाळून शहीदांना श्रद्धांजली वाहिली. देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वासाठी आम्ही सरकार आणि लष्कारासोबत असल्याचे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. दहशतवादाविरोधातील लढाईत काँग्रेस सरकारसोबत असल्याचे आझाद यांनी सांगितले. पंतप्रधानांनी सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची बैठक बोलावून या गंभीर मुद्द्यावर चर्चा करावी असे आवाहन आझाद यांनी केले. त्याला सर्व पक्षांनी पाठिंबा दर्शवला.

या सर्वपक्षीय बैठकीत त्रिसूत्रीय प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यात पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. देशातील नागरिक शहीदांच्या कटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहेत. पूर्ण देश त्यांच्या पाठिशी उभा आहे. सीमेपलीकडून दहशतवादाला मिळणाऱ्या प्रोत्साहनाचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला. देश या आव्हानाचा मुकाबाला करत आहे. या लढाईत देश एकत्र आहे. या लढाईत आम्ही सुरक्षा दलाच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत. असे या त्रिसूत्रीय प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. या बैठकीला गृह सचिव राजीव गाबा, सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, डाव्याचे नेते डी.राजा, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या