
‘मोठे कलाकार घेऊनच नाटक करायला हवे या विचारांना ‘ऑल द बेस्ट’ नाटकाने खो दिला. चौकट मोडली. नवीन चांगल्या कलाकारांना घेऊनही यशस्वी नाटक करता येते हे दाखवून दिले. ‘ऑल द बेस्ट’ नाटक अजूनही अनेक भाषांत होईल,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक-नाटककार प्रशांत दळवी यांनी केले.
‘ऑल द बेस्ट’ हे धमाल विनोदी नाटक 12 भाषांत भाषांतरित झाल्याच्या निमित्ताने या नाटकाचे लेखक दिग्दर्शक देवेंद्र पेम यांचा सत्कार ज्येष्ठ लेखक प्रशांत दळवी आणि लेखक क्षितिज पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला. वेगवेगळय़ा संकल्पना घेऊन सातत्याने आगळेवेगळे कार्यक्रम आयोजित करणारे ज्येष्ठ रंगकर्मी, नाटय़ व्यवस्थापक अशोक मुळ्ये यांनी हा सत्कार सोहळा आयोजित केला. सोहळ्याला इरावती कर्णिक, सुरेश जयराम, नीरज शिरवईकर, राजू तुलालवार, विराजस कुलकर्णी असे अनेक नव्या-जुन्या पिढीचे लेखक हजर होते. उद्योगपती महेश मुद्दा यांच्या दादर येथील निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.
सत्काराला उत्तर देताना देवेंद्र पेम यांनी अशोक मुळ्ये तसेच ‘ऑल द बेस्ट’ चा प्रवास ज्यांच्यामुळे सुरू झाला ते निर्माते मोहन वाघ, नाटकाच्या पहिल्या संचातील कलाकार भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, संपदा जोगळेकर व एकांकिकेतील विकास कदम व दीपा परब यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नीलिमा गोखले अन्य काही जणांनी गाणी सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
100 व्या नाट्यसंमेलनानिमित्त…
यावेळी अशोक मुळ्ये म्हणाले, ‘ऑल द बेस्ट’ नाटक बारा भाषांमध्ये भाषांतरित होणे ही काwतुकास्पद बाब असून त्यासाठीच पेम यांचा हा सत्कार करत आहोत. 100 व्या नाटय़संमेलनाच्या निमित्ताने ही संकल्पना मला सुचली. नानाविध कल्पना माझ्या डोक्यात येत असतात, पण त्या प्रत्यक्षात येण्यासाठी पैशांची गरज असते. पण त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक कलाकर, मान्यवर, दानशूर व्यक्ती सढळ हस्ते मनापासून मदत करतात.. आणि त्यामुळेच मी हे कार्यक्रम यशस्वीरीत्या सादर करू शकतो.’