अल्ला ‘त्यांची’ काळजी घेईल, ९६ मुले असणाऱ्या तीन पित्यांचे वक्तव्य

59

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

जागतिक लोकसंख्येचा फुगा वर्षानुवर्ष फुगतच चालला आहे. अनेक देशांना वाढती लोकसंख्या आणि अन्न धान्याच्या तुटवडा याचा मेळ घालणे कठीण झाले आहे. विकसनशील देशांमध्ये ही समस्या वेगाने वाढत आहे. मात्र पाकिस्तानमधील नागरिकांना याचे काहीही वाटत नसल्याचे दिसून आले आहे. ९६ मुलांची पैदास करणाऱ्या तीन पाकिस्तानी नागरिकांनी या समस्येचे निराकरण करण्याची जबाबदारी अल्लावर सोपवली आहे. ‘आमची आणि आमच्या मुलांची काळजी, त्यांच्या गरजा ‘अल्ला’ पूर्ण करेल असे अजब वक्तव्य त्यांनी केले आहे.

पाकिस्तानमध्ये १९९८ नंतर तब्बल १९ वर्षांनी जनगणना करण्यात आली आहे. त्याचा अहवाल जुलै महिल्यात येणार आहे. पाकिस्तानच्या लोकसंख्येत १९९८ च्या तुलनेत तब्बल २० टक्के वाढ झाली असण्याची शक्यता आहे. त्यावेळी पाकिस्तानची लोकसंख्या १३ कोटी होती जी आता २० कोटींच्याही पुढे जाईल असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पाकिस्तानात राहणाऱ्या गुलजार खान यांना ३६ मुले आहेत. अल्लाने जर सगळे जग तयार केले आहे तर अल्लाच मुलांची काळजी घेईल असे ते म्हणाले. आम्हाला शक्तीशाली व्हायचे आहे असे गुलजार यांनी सांगितले. इस्लाम कुटुंब नियोजनाच्या विरोधात आहे त्यामुळे आम्ही ते करत नाही असेही गुलजार यांनी सांगितले. गुलजार यांची तिसरी पत्नी सध्या गरोदर आहे.

pakistan-gang

गुलजार यांचा भाऊ मस्तान वजीर खान यांनाही २२ मुले आहेत. तसेच त्यांचीही तीन लग्ने झाली आहेत. आपल्याला जी नातवंडे आहेत त्यांची संख्या आपण मोजू शकत नाही असे वजीर यांनी म्हटले आहे. अल्लाने वचन दिले आहे की ते आपल्याला जेवण देतील, तसेच इतर गरजाही भागवतील, मात्र लोकांचा विश्वास कमी झाला आहे असे वजीर सांगतात.

बलुचिस्तानच्या क्वेटामध्ये राहणारे जान मोहम्मद यांनाही ३८ मुले आहेत. १०० मुलांना जन्म देणे हे आपले लक्ष्य असल्याचे जान मोहम्मद यांनी म्हटले आहे. मोहम्मद यांची तीन लग्ने झाली आहेत त्यांना चौथे लग्न करायचे आहे. पाकिस्तानात बहुविवाह कायदेशीर आहेत, मात्र त्यांचे प्रमाण कमी आहे. पाकिस्तानमधले बहुतांश लोक लोकसंख्या वाढीशी सहमत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या