देशविदेशातील फळफळावळ

80

शेफ मिलिंद सोवन

आपल्या परिजनांना आवडणारे पदार्थ बनवायला गृहिणीला हुरूप येतो… सगळेच पदार्थ सगळ्याच सदस्यांना आवडतात असं नाही. मग कुणी खूश तर कुणी नाखूश… पण फळांपासून बनवलेले पदार्थ सगळेच खातात. म्हणूनच फळे घालून काही पदार्थ करावेसे वाटणं स्वाभाविक आहे. पण प्रत्येक पदार्थात थोडेच फळं घालता येणार… पदार्थांची चव वाढवायचं काम फळं निश्चित करू शकतात. आता दूध आणि फळं हे दोन्ही पदार्थ वेगवेगळ्या प्रकृतीचे… तरीही त्याची सांगड घालून शिकरण वगैरे केलं जातंच ना!

फळांचा स्वयंपाकात वापर करायला हवा. कारण त्यामुळे पदार्थांची चव वाढते. कडू कारले आहारात असले तर स्वास्थ्य चांगले राहाते. पोटातील जंतू कारल्यामुळे मरून जातात. शिवाय कारल्यामुळे कफही बरा होतो. काकडी प्रकृतीने थंड असते. त्यामुळे ती खाल्ल्यास तहान भागते. कडक उन्हात फिरताना मध्येच विकत मिळणारी काकडी खाल्ली तर पोटही भरते आणि तहानही भागते. लिंबू, आलुबुखारा, आवळा, पपई ही फळं त्या त्या ऋतूंमध्ये मुबलक मिळतात. पण आपण ती सहसा खात नाही. वास्तविक शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने ती गुणकारी असतात. पुडिंग, ऍपल पाय अशा हमखास आवडणाऱया पदार्थांमध्येही फळं असतातच. अनेकदा संत्रा भात, आमरसातील शिरा असे थोडे वेगळ्या पठडीतील पदार्थही करून पाहाता येतील.

या आठवडय़ाला दोन प्रकारच्या रेसिपी दिल्या आहेत. एक थोडी स्वीट आहे, तर दुसरी नमकीन आहे… त्यातली स्वीट रेसिपी मुद्दाम फ्रेश ऑरेंज वापरून केली आहे. बाजारात तयार ऑरेंज स्क्वाशही मिळते. संत्री मिळाली नाही तर हा स्क्वाश वापरूनही हा पदार्थ करता येईल. असं हे एक डेझर्ट बनवलंय. हे अगदी सोप्या पद्धतीने बनणारं आहे म्हणून येथे दिलं आहे. त्यात ऑरेंज स्क्वाश घातलंय, फळांपासून बनवलेले पदार्थ लगेच खावे लागतात. पण ही रेसिपी दोन ते तीन दिवस टिकू शकेल.

दुसरी रेसिपी अननसापासून बनवली आहे. कुकींगच्या दृष्टीने अननस हे एक असं फळ आहे जे अन्नपदार्थांमध्ये घातले तर वेगळा प्रभाव पडतो. मटणाच्या कबाबमध्येही अननसाचा गर टाकला तर मटण लवकर शिजते. तंदुरी कबाबमध्ये दही घातलं जातं. पण येथे अननसाचा गर वापरला आहे. पनीरचा हा कबाब खाताना छान अशी अननसाची चव येते. या कबाबमध्ये स्टफिंगही अननसाचंच केलेलं आहे.

ऑरेंज सरप्राइझ पुडिंग

साहित्य..  क्रीम दीड कप, खाण्याच्या ऑरेंज रंगाचे दहा थेंब, व्हॅनिला आईस्क्रीम 2 कप, ऑरेंज स्क्वॅश दीड कप, ऑरेंज इसेन्स ५ ते १० थेंब , पिठी साखर ४ चमचे, जिलेटिन १ चमचा.

कृती.. क्रिममध्ये साखर घालून फेटून घ्या. त्यानंतर व्हॅनिला आईस्क्रिम मेल्ट करून ऑरेंज स्कॅश, खाण्याचा रंग आणि इसेन्स घाला. दीड कप गरम पाण्यात जिलेटिन विरघळवा. नंतर गरम पाण्यात विरघळवलेले जिलेटिन आणि आईस्क्रिम एकजीव करा. यामध्ये फेटलेले क्रिमही घाला. हे मिश्रण सेट करण्याकरिता फ्रिझरमध्ये ठेवा.

पनीर-अननस टिक्का

साहित्य  ५००ग्रॅम पनीर, अननसाचा गर २५० ग्रॅम, घट्ट दही ३०० ग्रॅम, क्रीम ५०मि.ली., आल्याचे तुकडे अर्धा चमचा, ठेचलेली काळीमिरी १ चमचा, चवीपुरते मीठ, हिरवी किंवा लाल सिमला मिरची प्रत्येकी १, अननसाच्या चकत्या ४, साखर.

कृती पनीरच्या क्युबचे २ इंच लांबी आणि अर्धा इंच जाडीचे एकसारखे तुकडे करावेत. या तुकडय़ांमध्ये मसाला भरण्यासाठी आतमध्ये कापावे. अननसाच्या तुकडय़ांची २०० ग्रॅम पेस्ट करावी, काही अननसाचे तुकडे तसेच ठेवावेत. त्यानंतर दही, अननसाची पेस्ट एकत्र करून त्यामध्ये बारीक चिरलेले आले, ठेचलेली मिरी, क्रिम, चवीपुरते मीठ घालून मिश्रण एकजीव करावे. अननसाचे बारीक तुकडे पनीरमध्ये भरावेत. सिमला मिरचीच्या बिया काढून टाकून २ इंचीचे तुकडे करावेत. नंतर सिमला मिरचीचे तुकडे आणि पनीर क्युब वरील मिश्रणात मॅरिनेट करण्यासाठी १५ ते २० मिनिटे ठेवावे. अननसाच्या चकत्यांवर साखर आणि मीठ पसररावी, त्यानंतर पनीर क्युब, सिमला मिरची आणि अननसाच्या चकत्या कबाबच्या सळईमध्ये खोचाव्यात आणि तंदूरमध्ये ६ ते८ मिनिटे ठेवाव्यात किंवा मायक्रोव्हेव्ह ओव्हनमध्ये कबाबच्या सळईमध्ये खोचून  २०० डिग्री तापमानावर ८ ते १० मिनिटे ठेवाव्यात. गरमागरम सर्व्ह करावे.

आपली प्रतिक्रिया द्या