सदाबहार संगीतकार

1538

धनंजय कुलकर्णी   email : [email protected]

मराठी चित्रपट संगीत लोकप्रिय करण्यात ज्या मोजक्या संगीतकारांचे कर्तृत्क कारणीभूत ठरले त्यात राम कदम यांचे स्थान करचे आहे. राम कदमांचे संगीत म्हणजे इथल्या मातीतील संगीत. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला वेध.

वरचा विधाता कुणाचं विधिलिखित काय लिहून ठेवेल हे सांगणं खरंच अवघड असतं; आणि ही व्यक्ती जर कलावंत असेल तर तिच्या आयुष्यातील यशापयशाचा आलेख चितारताना त्या विधात्याचे हातही थरथरत असतील का? चित्रपटसृष्टीत अशी असंख्य उदाहरणं आहेत ज्यांचा जीवनालेख सुखदुःखाच्या / मानसन्मानाच्या चढउताराने खच्चून भरलेला दिसतो. मराठी चित्रपटात आपल्या संगीताने आपलं वैशिष्टय़पूर्ण असं आगळेवेगळे स्थान निर्माण करून आपल्या मातीचा अस्सल बाणा जपणारा कलावंत म्हणजे संगीतकार ‘राम कदम’! आज १९ फेब्रुवारी संगीतकार राम कदम यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या सांगीतिक जीवनाचा हा आलेख. त्यांच्या जीवनाची ही चित्तरकथा अनेकानेक वळण घेत कटू आणि गोड चव चाखत, यशापयश यांचा पाठशिवणीचा खेळ सांभाळत घडत गेली. एकेकाळी प्रभात स्टुडिओमध्ये फरशी पुसणारे राम कदम पुढे प्रतिभेच्या जोरावर उंच भरारी घेत शांतारामबापूंच्या ‘पिंजरा’ चित्रपटाला संगीत देऊन यशाचा मोठा इतिहास निर्मितात हे सारंच मोठं विलक्षणीय होतं! संगीतकार राम कदम यांचं मराठी चित्रकर्तृत्व एवढं अफाट आहे की त्यांनी जवळपास १२० मराठी चित्रपट स्वरबद्ध केले. यात त्यांनी तब्बल ११४ गायक/गायिकांचे स्वर वापरले. यात सूरश्री लता मंगेशकर, आशा, उषा, मोहम्मद रफी, पं.भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, शोभा गुर्टू , मन्ना डे आदी मान्यवरांचा सहभाग आहे.  राम कदमांचे संगीत म्हणजे इथल्या अस्सल मातीतील संगीत! पन्नासचे दशक जसे फडके-गदिमा आणि राजा परांजपे या त्रयीने गाजवले, तर साठ आणि सत्तरचे दशक राम कदम- जगदीश खेबुडकर आणि अनंत माने या त्रयीने गाजवले !

रामभाऊ कदम यांचे घराणे मूळचे कुरुंदवाडचे! पण त्यांचे आजोबा गाव सोडून मिरज या शहरात स्थलांतरित झाले. इथेच कदमांच्या वडिलांची खानावळ होती. रामचा जन्म इथलाच (२८ ऑगस्ट १९१८). जन्म गोकुळाष्टमीचा असला तरी नाव मात्र राम ठेवलं. घरात कलेचं काहीही वातावरण नव्हतं, परिस्थिती यथातथाच, शाळेतील अभ्यासातही लक्ष नव्हतंच! अशा या नकारार्थी वातावरणात राम कदमांचं कलाजीवन कसं फुललं? त्यांना लहानपणापासून वाद्यांबाबत फार आकर्षण होतं यामुळे रामचं लक्ष कायम बॅंन्डपथकाकडे जायचं. इथेच ते क्लॅरोनेट वाजवायला शिकले. पुढे पथकात वाजवू लागले. कुणीतरी नतद्रष्ट ज्योतिषाने ‘या मुलाला घरापासून लांब ठेवा. तो घरात राहिला तर दारिद््य येईल’ अशी भविष्यवाणी केली. अन् रामाचा वनवास सुरू झाला!

प्रभात चित्र संस्थेचे छायाचित्रकार ई.महमद मूळचे मिरजेचेच. त्यांनीच रामला पुण्याला बोलावून घेतलं. वयाच्या २२ व्या वर्षी रामभाऊ प्रभातमध्ये दाखल झाले ऑफिसबॉय म्हणून! पगार महिना ७ रुपयेप्रमाणे सेवा सुरू झाली. शांतारामबापूंची खोली झाडताना रामभाऊंना कमीपणा कधीच वाटला नाही. उलट एवढय़ा प्रतिभासंपन्न व्यक्तीची सेवा करण्याची संधी मिळतेय याचा आनंद झाला. हळूहळू प्रभातच्या संगीत विभागात त्यांचा प्रवेश झाला आणि मान्यवर संगीतकाराचा त्यांना सहवास लाभला. प्रभात चित्र संस्था आदर्श विचार मूल्यांवर चालणारी होती त्यामुळे इथे जे घडत असे ते पवित्र, सर्वोत्कृष्ट आणि चिरंतन टिकणारे असायचे. राम कदमांच्या आयुष्यातील ही १० वर्षे त्यांच्यातील कलावंताला घडवणारी होती. इथेच त्यांना पु. ल. देशपांडे, देव आनंद, गुरुदत्त यांचा सहवास लाभला, पण स्वातंत्र्यानंतर प्रभातचाही उतरणीचा कालखंड सुरू झाला. राम कदम प्रभातमधून बाहेर पडल्यावर त्यांना कोल्हापूरहून भालजी पेंढारकर यांनी बोलावले. गांधीहत्येनंतर भालजींचा जयप्रभा स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला व त्यावेळी ‘मीठ भाकर’ या चित्रपटाची प्रिंटही भस्मसात झाली. भालजी यांनी तो सिनेमा परत बनवला. त्याचं संगीत राम कदम यांचं होतं! (पण पूर्वीच्या शर्थीनुसार संगीतकार म्हणून कशाळकर यांचेच नाव श्रेयनामावलीत राहिलं!) रामभाऊ नाराज झाले, पण लवकरच त्यांना ‘गावगुंड’ हा सिनेमा स्वरबद्ध करायला मिळाला.

पण सुरुवातीची १० वर्षे कदमांची परीक्षा पाहणारी ठरली. यश कायमच हुलकावणी देत होतं. नशिबाचे फासे कायमच उलटे पडत होते. सुधीर फडके, वसंत पवार यांच्याकडे सहायकाचं काम चालूच होतं. १९५९ सालच्या अनंत मानेच्या ‘सांगते ऐका’तील ‘बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला’ ही फक्कड लावणी रामभाऊ कदम यांनी स्वरबद्ध केली होती. पण ही कामगिरी सहाय्यकाच्या रूपातली असल्याने रसिकांना उशिरा लक्षात आली. १९६० सालानंतर परिस्थिती जरा बदलली. सख्या सावरा मला, रंगपंचमी, वैभव, केला इशारा जाता जाता, बाई मी भोळी, देवा तुझी सोन्याची जेजुरी, एक गाव बारा भानगडी, मुक्काम पोष्ट ढेबेवाडी हे साठच्या दशकातली त्यांनी संगीत दिलेले चित्रपट गाजले. राम कदम यांनी आपल्या संगीतात सर्व गीत प्रकार हाताळले. लावणी, गण गौळण, सवाल जवाब, झगडे, भक्तीगीत, भावगीत, भूपाळी, भारूड, विराणी तसेच लग्नाची/मंगळागौरीची/हादग्याची/ नागोबाची/ संक्रांतीची / गौरी गणपतीची /कोळ्याची/धनगराची/ मोटेवरची/ वासुदेवाची /भुत्याची/ पोतराजाची ही अस्सल मराठी मातीतल्या संस्कृतीची गाणी त्यांनी दिली. जगदीश खेबूडकर, अनंत माने या दोघांसोबत चांगली जोडी जमली. (तालासुराची गट्टी जमली) या त्रयीच्या कलेचा कळस शोभावा असा चित्रपट आला १९७२ साली शांतारामबापूंचा ‘पिंजरा’! या सिनेमाच्या १० गाण्यांकरिता रामभाऊ यांनी तब्बल १०० चाली बांधल्या होत्या. बापूंच्या ‘सर्वोत्कृष्टतेच्या आग्रहामुळे’ संगीतकाराच्या कलेचा कस लागला. यातील ‘दे रे कान्हा चोळी अन् लुगडी’ या गीताच्या वेळी बासरी आणि सतार वाजविण्याकरिता राम कदमांनी हरिप्रसाद चौरसिया आणि शिवकुमार शर्मा यांना पाचारण केलं होतं.

‘पिंजरा’नंतर त्यांच्या संगीताला एक ‘ओळख ’ मिळाली. ‘लावणी सम्राट’ ही बिरुदावली चिकटली गेली. लावणीमधील झील प्रकारात त्यानी वेगळत्व आणले. गायिका उषा मंगेशकरच्या लावण्यांनी संपूर्ण महाराष्ट्र डोलू लागला. सोंगाडय़ा, एकटा जीव सदाशिव, चंदनाची चोळी, झुंज, सुगंधी कट्टा, देवकी नंदन गोपाला, लक्ष्मी , सुशीला, पैज, जन्मठेप, पैंजण, पवळा हे त्यांचे चित्रपट गाजले. पण तरीही त्यांचा प्रवास सुखकारक कधीच नव्हता. कधी कौटुंबिक वादविवाद, चित्रपटाच्या बेहिशेबी दुनियेतलं जिणं, व्यावहारिक दुनियेत भिडस्त स्वभावाचा घेतलेला गैरफायदा हे सारं ओघाने येत गेलं. सिनेमाची मायावी दुनिया ही उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी असते. इथे अपयशामागच्या प्रतिभेला कधीच विचारात घेतले जात नाही. चांगली मनासारखी गाणी दिलेले रामभाऊ यांचे चित्रपट चालले नाहीत, तर कधी प्रदर्शितच झाले नाहीत. आज राम कदम यांचा स्मृतिदिन. १९९७ साली ते गेले. त्यांना आठवण्याचे दुसरे कारण म्हणजे या वर्षीपासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होते आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या