हिलीने मोडला धोनीचा विक्रम, टी-20त यष्टीरक्षणात मिळवले सर्वाधिक बळी

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची यष्टीरक्षक एलिसा हिली हिने रविवारी महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडीत काढला. तिने यष्टीरक्षणात 92 बळी घेत महेंद्रसिंग धोनीच्या टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील 91 बळींना लीलया मागे टाकले. पुरूष व महिला या दोन्हींचा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटचा विचार करता आता एलिसा हिली पहिल्या स्थानावर विराजमान आहे. याचसोबत ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने रविवारी येथे झालेल्या दुसऱया टी-20 लढतीत न्यूझीलंड संघावर आठ गडी राखून दमदार विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. न्यूझीलंडकडून ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 129 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाने अवघे दोन गडी गमावत हे लक्ष्य लीलया ओलांडले. एलिसा हिलीने 33 धावांची, बेथ मुनीने 24 धावांची, कर्णधार मेग लॅनिंगने नाबाद 26 धावांची आणि रचेल हेन्सने नाबाद 40 धावांची खेळी साकारत ऑस्ट्रेलियाच्या दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

त्याआधी प्रथम फलंदाजी करणाऱया न्यूझीलंडचा डाव 128 धावांमध्येच आटोपला. न्यूझीलंडकडून ऍमी सॅटर्थवेटने सर्वाधिक 30 धावांची खेळी साकारली. सूझी बेटस् हिने 22 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून डेलीसा किमीन्स व जॉर्जिया वेअरहॅम यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. सोफी मोलीनियोक्स हिची प्लेअर ऑफ दी मॅच म्हणून निवड करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या