बदलापूर शहरातील आदर्श शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. मंगळवारी या घटनेविरोधात संतप्त बदलापूरकरांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन केले आहे. गेल्या दोन तांसांपासून मध्य रेल्वेची बदलापूरवरून जाणारी लोकलसेवा ठप्प आहे. या घटनेबाबत राज्याभरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान हैद्राबादमध्ये जसे नराधमांना शूट केलं तशीच शिक्षा या आरोपींना झाली पाहिजे, असा संताप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे.
”एकीकडे लाडकी बहिण नावाने शोबाजी करण्याचा प्रयत्न सरकार करतंय तर दुसरीकडे राज्यात महिलांविरोधात गुन्हे वाढत आहे. गेल्या काही दिवसात उरण, बेलापूर, मीरा-भाईंदर मुंबईत अशा घटना उघडकीस आल्या. बदलापूरची घटना निषेधार्ह आहे. असं कृत्य करणाऱ्या लोकांना जसं आंध्रात शूट केलं होतं. तशीच शिक्षा देण्याची गरज आहे. गुन्हेगार मोकाट सुटलेयत त्याला सत्ताधारी जबाबदार आहेत. हे सत्ताधारीचच गुन्हेगारांना संरक्षण देतायत अशी परिस्थिती आहे. गुन्हेगारांवर कडक कारवाई झाली पाहिजे. आता मोठ्या शहरांसोबतच बदलापूरसारख्या छोट्या शहरात असे प्रकार घडत असतील नागरिकांचा असा आक्रोश होणारच, असे अंबादास दानवे म्हणाले.