बच्चन कुटुंबियांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत अमर सिंह यांनी व्यक्त केली दिलगिरी

938

अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत आपण केलेल्या वक्तव्याचा आपल्याला पश्चाताप होत असल्याचे समाजवादी पक्षाचे माजी ज्येष्ठ नेते अमर सिंह यांनी म्हटले आहे. आज आपल्या वडिलांची पुण्यतिथी आहे. त्याबाबत अमिताभ बच्चन यांचा मेसेज आपल्याला मिळाला आहे. जीवनाच्या या टप्प्यात मी मृत्यूशी मुकाबला करत आहे. अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कटुंबियांबाबत आपण मर्यादा सोडून वक्तव्य केल्याचा आपल्याला पश्चाताप होत आहे, असे अमर सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ईश्वराची त्या कुटुंबांवर नेहमी कृपादृष्टी राहो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

अमर सिंह यांना काही वर्षांपूर्वी किडणीसंबंधित आजार असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर ते सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. अमर सिंह आणि अमिताभ बच्चन यांची खास मैत्री होती. मात्र, काही कारणाने त्यांच्यातील तणाव वाढून त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाले होते. त्यानंतर अमिताभ यांनी आपल्याशी मैत्रीचे संबंध तोडले असल्याचे अमर सिंह यांनी जाहीर करत अमिताभ बच्चन आणि त्यांचे कटुंबिय वेगळे राहत असल्याचा दावा केला होता. ज्यावेळी आपण अमिताभ यांनी भेटलो, त्यावेळी ते आणि जया बच्चन वेगवेगळे राहत होते. एकजण प्रतीक्षा बंगल्यात तर दुसरा जनक बंगल्यात राहत होता, असे त्यांनी 2017 मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते. तसेच जया आणि ऐश्वर्या राय यांचे पटत नसल्याचा दावाही त्यांनी केला होता. समाजवादी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारू नये, असेही अमिताभ यांनी जया बच्चन यांना सांगितले होते, असे अमर सिंह म्हणाले होते. 2017 मध्ये पनामा पेपर लीक प्रकरणात अमिताभ यांचे नाव आल्यानंतर अमिताभ यांनी या प्रकरणात पाळलेले मौन एका नायकाला खलनायक बनवेल, असे वक्तव्यही त्यांनी केले होते. त्यावर अमर सिंह यांना हवे तसे, त्यांच्या मनात येईल तसे वक्तव्य ते करू शकतात अशी प्रतिक्रिया अमिताभ यांनी दिली होती.

आता मृत्यूशी मुकाबला करत असताना आपल्याला आपला चुका जाणवत आहेत. आता आपण जीवन मृत्यूच्या उंबरठ्यावर उभे आहोत. त्यावेळी अमिताभ आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत आपण मर्यादा सोडून वक्तव्य करणे, अयोग्य होते, त्याचा पश्चाताप होत असल्याचे अमर सिंह यांनी स्पष्ट केले आहे. त्या वक्तव्याबाबत आता त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या