Video – बालकलाकाराने कुशलतेने साकारली सुरेख, सुबक श्रीगणेशाची मुर्ती; बघा थक्क करणारा व्हिडीओ…

सर्वांच्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची वेळ अगदी जवळ आली आहे. भक्तजन बाप्पाच्या स्वागताच्या तयारीत गुंतले आहेत. फक्त मुंबई, महाराष्ट्र आणि देशातच नाही तर असंख्य देशांमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. घरोघरी गणपती बाप्पा बुधवारी विराजमान होणार आहेत. पुढचे काही दिवस गणपती बाप्पा आपल्या भक्तांचा पाहुणचार स्वीकारणार आहेत.

घरोघरी आनंद घेऊन येणारा, सुखकर्ता आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पा घडवण्याचे काम उत्सवाच्या काही महिने आधीपासूनच सुरू होते. गणपती बाप्पाची मुर्ती घडवणे हे सहजसोपे काम नाही. शाडूच्या मातीपासून गजाननाची मुर्ती घडविण्यासाठी कुशलतेची गरज असते. अनुभव असलेली ज्येष्ठ मंडळी यामध्ये वाकबगार असतात. मात्र एक चिमुरडा असा आहे ज्याने भल्याभल्यांना थक्क करणारी कुशलता दाखवत अत्यंत वेगाने सुरेख गणपतीची मुर्ती साकारली आहे.

 

लिम्का बुक रेकॉर्ड विजेते आणि मेजर सुरेंद्र पूनिया यांनी कू या सोशल मीडिया अॅपवर या मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. गणपती बाप्पाची सोंड घडवताना हा मुलगा आपल्याला या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तो ज्या वेगाने हे काम करतोय ते आश्चर्यकारक आहे. हा मुलगा वेगाने काम करतोच आहे मात्र ते करत असताना मुर्तीचं देखणेपण कुठेही कमी होऊ देत नाहीये हे विशेष.

मेजर पुनिया यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर या बालमुर्तीकाराचं सगळेजण कौतुक करत आहेत. मुलाचं कौशल्य पाहून नेटीझन्सनी या मुलावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या मुलाच्या अंगी असलेले गुण हे आश्चर्यजनक आणि अद्भुत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय.