अद्भूत वाळणकोंड

261

<< भटकंती >> << संदीप शशिकांत विचारे >>

रायगड जिल्र्ह्यातील महाड तालुका ऐतिहासिकदृष्टय़ा श्रीमंतच. कारण दुर्गदुर्गेश्वर रायगड महाडजवळच आहे. महाड आणि त्याच्या आजूबाजूला बघण्यासारखे बरेच काही आहे. जसे की महाडमधील चवदार तळे, गांधार पाल्याची लेणी, सवजवळील गरम पाण्याचे झरे, चांभारगड, रायगड, मंगळगड, शिवथर घळ, वरंधा घाट, पर्यटकांची पावले अधूनमधून वरील ठिकाणांकडे वळत असतात. पण महाड-बिरवाडीजवळील ‘वाळणकोंड’ तसं अजूनही स्थानिक लोकांशिवाय जास्त कोणाला माहीत नाही.

कोंड म्हणजे नदीच्या पात्रातील कुंड, खोल डोह. नदी जेव्हा डोंगरातून खळाळत खाली उतरते तेव्हा तिच्या पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे वाटेतील खडक कापले जातात. खडकांमध्ये खोल, अरुंद फट पडते आणि लहान मोठे खळगे निर्माण होतात. त्यांना रांजणखळगे असे म्हणतात. पुण्याजवळील निघोजगावातील कुकडी नदीच्या पात्रातील रांजणखळगे प्रसिद्ध आहेत. सुधागड तालुक्यातील नागशेत गावाजवळील लतकोंडीच्या रांजणखळग्यांकडे आता पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. महाड – बिरवाडीजवळील काळ नदीच्या पात्रातील रांजणखळगे स्थानिक आणि ट्रेकर्स लोकांव्यतिरिक्त इतर पर्यटकांना तसे अपरिचितच!

महाड शहरातून बिरवाडी एम. आय. डी. सी. ओलांडून वारंगीच्या रस्त्याला लागायचे. मांगरूण, वाघोली अशी गावे मागे टाकून वाळणकोंडीजवळ पोहोचायचे. रस्ता बरा आहे. वाळणकोंडीजवळ पोहोचताच आपण क्षणभर उत्तरेतील हिमालयाच्या पायथ्याला असणाऱ्या गावांमध्ये तर आलो नाही ना असं आपल्याला आपसूकच वाटेल. कारण वाळणकोंडीच्या काळ नदीच्या पात्रावर इथं एक लक्ष्मणझुल्यासारखा लोखंडी वायर रोपचा पूल आहे. या पुलावरूनच वाळणकोंडीच्या डोहात डोकावले की, आश्चर्याचा अजून एक धक्का आपल्याला बसतो. कारण खालील डोहात असंख्य मोठे मासे आपल्याला विहार करताना दिसतात. पूल ओलांडून पलीकडे आल्यावर विस्तृत स्वरूपात आपण रांजणखळगे पाहू शकतो. इथे देवीचे एक जागृत ठाणे आहे. संध्याकाळी इथ आल्यास हे शांत, रमणीय ठिकाण आपल्याला एका वेगळय़ाच भावविश्वात घेऊन जाते. हे ठिकाण स्थानिक आणि पंचक्रोशीतल्या लोकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला आपली गाडी व्यवस्थित पार्क करून शांतपणाने आणि अनवाणी पायाने वाळणकोंडची भटकंती करावी.

वाळणकोंडचा परिसर तुम्हाला नेत्रसुखाबरोबरच शौर्याची कहाणीही सांगेल. पूर्वेकडे सहय़धारेवर राजगड, तोरण्याहून कोकणात रायगड महाडकडे येणारे घाटरस्ते आणि पलीकडे बोराटय़ाची नाळ हा परिसर ट्रेकर्सना कायम खुणावणारा. त्यामुळेच  घाटावरील सिंगापूर गावातून कोकणात उतरणारी सिंगापूरची नाळ, फडताळ नाळ, शेवत्या घाट आणि आपल्या पुढय़ात दिसणारा मढय़ा घाट हे आडवळणीच राहिले आहेत. याच मार्गांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वराज्य निर्माण करणारे शिवप्रभूंचे शूर शिलेदार घाटावरून कोकणात चढले, उतरले. सिंहगडावर प्राणाची आहुती देणाऱया तानाजी मालुसऱयांचे पार्थिव राजगडहून मढय़ा घाटातून पालखीतून पोलादपूरजवळील उमरठ येथे नेण्यात आले. असा हा भारावलेला परिसर एकदा डोळय़ाखालून घालायला काहीच हरकत नाही.

महाड-बिरवाडी – मांगरूण-वारंगी-पाने, सांदोशी-कोंझर-महाड असा काळ नदीच्या खोऱयातील रस्ता तयार आहे. दुर्गदुर्गेश्वर रायगड चहू अंगांनी न्याहाळता येईल. पाने गावातील लिंगाणा, कोकणदिवा  ही ट्रेकर्सची आवडती ठिकाणे हौशी पर्यटकांच्या नजरेच्या टप्प्यात येतील. आपल्या महाड-रायगड – शिवथरघळ भेटीच्या दरम्यान अद्भुत वाळणकोंडला अवश्य भेट द्या आणि निसर्ग, स्थापत्य आणि अध्यात्म यांचा मनमुराद आनंद लुटा!

आपली प्रतिक्रिया द्या