अमेझॉन हिंदुस्थानातील बरेचसे उद्योग बंद करण्याच्या तयारीत, एका झटक्यात अनेकांची नोकरी जाण्याची भीती

amazon

अमेरीकेची बलाढ्य कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेझॉनने हिंदुस्थानातील आपले बरेचसे उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की अमेझॉनने हे उद्योग बंद केल्यास अनेकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. अमेझॉन हिंदुस्थानातील इतर सगळे उद्योग बंद करून फक्त रिटेल म्हणजेच मध्ये कोणताही दलाल न ठेवता उद्योगांकडून थेट ग्राहकांना विक्रीचा व्यवसायच सुरू ठेवणार असल्याचे ब्लूमबर्गने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. ई-कॉमर्सची बाजारपेठ विस्तारत जात असून यामध्ये नवनव्या कंपन्या उतरत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा ग्रुप, वॉलमार्ट, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांनी अमेझॉनपुढे तगडं आव्हान उभं केलं आहे. वाढत्या स्पर्धेमुळे अमेझॉनपुढे समस्या निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे.

अमेझॉनने काही दिवसांपूर्वी फूड डिलिव्हरी म्हणजेचे खाद्य पदार्थ घरपोच करण्याची सुविधा बंद केली आहे. याशिवाय अमेझॉनने छोटे व्यापारी, कंपन्या यांना होलसेल दरात वस्तू पोहचवण्याची सेवाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरात अमेझॉनचा व्यवसायवाढीचा दर मंदावल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी खर्च कमी करणे आणि नोकऱ्यांची संख्या कमी करणे यावर भर दिला आहे.

अ‍ॅमेझॉन कंपनी तोट्यात, दहा हजार कर्मचाऱ्यांना देणार डच्चू

जगातली सर्वात जास्त चालणारी ई कॉ़मर्स कंपनी अ‍ॅमेझॉन कंपनी तोट्यात असल्याचे समजते. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी कंपनीने तब्बल दहा हजार कर्मचाऱ्यांनी नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जगभरातील अ‍ॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी एलॉन मस्कने ट्विटर कंपनी विकत घेतल्यानंतर ट्विटरमधून तब्बल 50 टक्के कर्मचाऱ्यांना डच्चू देण्याचे ठरवले आहे. एकट्या हिंदुस्थानातून तब्बल 75 टक्के कर्मचारी कपात केली जाणार आहे. त्यातच आता आणखी एका परदेशी कंपनीने मोठ्या प्रमाणात नोकर कपात करण्याचे ठरवले आहे.

न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अ‍ॅमेझॉन अलेक्सा वॉईस असिस्टंट, डिव्हिजन आणि ह्यूमन रिसोर्स या विभागातील कर्मचाऱी कमी करणार आहे. कोविडच्या काळात अ‍ॅमेझॉनने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. मात्र आता कोरोना काळ संपल्यानंतर अ‍ॅमेझॉनचा नफा दिवसेंदिवस घटत चालला आहे. त्यामुळे कंपनीने दहा हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जर अ‍ॅमेझॉनने असे केले तर ही त्यांची आतापर्यंतची सर्वात मोठी नोकर कपात असणार आहे.