
लातूरमधील औसा तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या एका बैलाचा विज पडून मृत्यू झाला. आधीच आर्थिक संकटात असलेल्या गायकवाड यांच्याकडे दुसरा बैल खरेदी करायला पैसे नसल्याने त्यांनी नांगराला एका बाजूला उरलेला एक बैल आणि दुसऱ्या बाजूला आपली पत्नी औशाबाई काशिनाथ गायकवाड यांना जुंपले. औशाबाई यांचा जोत ओढतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार अंबादास दानवे यांनी एक खरमरीत पोस्ट टाकत सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घातलं आहे.
नांगर ओढणाऱ्या हौसाबाई गायकवाड…
पंतप्रधान मोदी यांनी सर्वाधिक काळ पदावर राहण्याचा विक्रम करत असताना देशातील भाजप सध्या ‘सेलिब्रेशन मोड’मध्ये आहे. होय, ही तीच भाजप आहे जिने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे पोकळ आश्वासन दिले होते. हा विक्रम पूर्ण होण्याच्या… pic.twitter.com/Usr7uRa8jI
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 9, 2026
”पंतप्रधान मोदी यांनी सर्वाधिक काळ पदावर राहण्याचा विक्रम करत असताना देशातील भाजप सध्या ‘सेलिब्रेशन मोड’मध्ये आहे. होय, ही तीच भाजप आहे जिने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे पोकळ आश्वासन दिले होते. हा विक्रम पूर्ण होण्याच्या पूर्वसंध्येला औसा तालुक्यातील बोंबळी गावातील हौसाबाई गायकवाड या बैलाच्या साथीने स्वतः नांगर ओढताना दिसल्या, कारण त्यांचा बैल विजेच्या तडाख्यात मरण पावला. आता २०२६ चे निम्मे वर्ष संपत आले, तरीही या शेतकऱ्याकडे दुसरा बैल खरेदी करण्याची ताकद उरलेली नाही”, अशी टीका अंबादास दानवे यांनी या पोस्टमधून केली आहे.
या पोस्टमधूनच त्यांनी ”मोदींच्या विक्रमाच्या सेलिब्रेशनचाच एक भाग म्हणून का होईना, भाजप नेत्यांनी या महिला शेतकऱ्याला लगोलग एक बैल पोहोचता करायला काय हरकत आहे? असे अंबादास दानवे यांनी या पोस्टमधून म्हटले आहे.





























































