देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कथित आरोपांवरून नवाब मलिक यांना तुरुंगात जावे लागले होते, मात्र ते तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली असल्याने मलिक हे अजित पवारांसोबत गेले. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पत्र धाडत मलिक यांना महायुतीतून काढण्यास सांगितले होते. मात्र भाजपचा विरोध झुगारून देखील नवाब मलिक यांच्याबाबत अजित पवार यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही.
यावरून शिवसेना नेते, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावरून भाजपला फटकारले आहे. ”नवाब मलिकांनी आपल्या नावासह ‘घड्याळ’ लावून ते कोणासोबत आहेत हे जगजाहीर केलं. ‘दाऊद सोबत बसणाऱ्या सोबत आम्ही राहू शकत नाही’.. असं घसा कोरडा पडेपर्यंत मुख्यमंत्री शिंदे ओरडत होते. दुसरीकडे सुपर सीएम फडणवीस यांनी आपलं ‘तत्व’ सांगायला पत्ररुपी स्वस्त पब्लिसिटीचा आधार घेतला होता. आज मलिकांनी घड्याळ चिन्ह दाखवून मुख्यमंत्र्यांचा आणि फडणवीस यांचे ‘सो कॉल्ड’ तत्व निव्वळ केरात घातले आहेत. यावर हे दोघे बोलले नाहीत तर ते जनतेकडून ‘खोटारड्यांचे मुकुटमणी’ म्हणवले जातील”, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.