इंग्रज व मुघलांनाही लाजवेल एवढी सत्तेची मस्ती आजच्या सत्ताधाऱ्यांमध्ये, अंबादास दानवे यांनी फटकारले

धुळ्यातील साक्री तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा एक एकत्रित कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी एका आदिवासी कुटुंबाची झोपडी होती. ऐन पावसाळ्यात या कार्यक्रमासाठी प्रशासनाने या कुटुंबाची झोपडी जमीनदोस्त केली असून तिला पेटवून दिले आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागिरकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावरून राज्य सरकारला फटकारले आहे. ”जागतिक आदिवासी दिनी सरकारचे रिटर्न गिफ्ट! धुळ्यातील साक्री तालुक्यात होणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आदिवासी कुटुंबांची झोपडी मध्ये येत असल्याने ती जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करून जाळण्यात आली. ही सत्तेची मस्ती नाही का? इंग्रजांना आणि मुघलांनाही लाजवेल एवढी सत्तेची मस्ती आज सत्ताधारी करत आहेत. अशाप्रकारे आदिवासी कुटुंबांच्या संसाराची होळी केली जात आहे, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. अहो, अतिक्रमणही पावसाळ्यात काढून कोणाचे छत असे अकस्मात हिसकावून घेतले जात नाही. आपल्या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्रमासाठी या आदिवासी कुटुंबाला विस्थापित केलंय, उद्या आपण याठिकाणी येणारच आहात तर या कुटुंबाचं पुनर्वसन आपण करायलाच पाहिजे. या आदिवासी कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर सरकार केवळ भंपकबाजी करतंय, हे सिद्ध होईल, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.